उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू, नगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 09:42 AM2022-11-14T09:42:44+5:302022-11-14T09:43:11+5:30
पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : (जि. अहमदनगर) : पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला.
ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ )स्वप्निल सतीष मनुचार्य (वय२४), गणेश बापु शिंदे (वय २५) या युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली. सोमवारी सकाळी घोड नदीतिरी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक समजलेली माहिती अशी की, मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून जात असताना समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅकटरला धडकले. यात त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करताना इतरांना दिसून येत नाहीत. त्यामुळे असे अपघात होऊन आतापर्यत तालुक्यातही अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
गेल्या वर्षी श्रीगोंदा व काष्टी येथील तीन तरुणांचा श्रीगोंदा शहरातील काष्टी ते श्रीगोंदा महामार्गावर असाच अपघात होऊन मृत्यू झाला होता. प्रशासन व कारखानदार यांनी निष्पाप लोकांचे जीव जाण्याची वाट पहात न बसता या विनारिफ्लेकटर प्रवास करणाऱ्या वाहनांबाबत कडक कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"