भाजपाचे तीन उमेदवार बिनविरोध, आघाडीची तलवार म्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:23 AM2021-02-09T04:23:54+5:302021-02-09T04:23:54+5:30
अहमदनगर : जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप विरोधातील तलवार म्यान केली आहे. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपाचे ...
अहमदनगर : जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप विरोधातील तलवार म्यान केली आहे. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपाचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे रोहित पवार हे आमदार असलेल्या जामखेड तालुक्यातून राष्ट्रवादीने माघार घेतल्याने भाजपाचे जगन्नाथ राळेभात हे बिनविरोध संचालक झाले आहेत. भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्याविरोधात आघाडीने सक्षम उमेदवार न दिल्याने त्यांचीही निवड सोमवारी बिनविरोध झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपाने एकमेकांविरोधात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपाचे एकापाठोपाठ तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. जामखेड तालुक्यातून राष्ट्रवादीचे सुरेश भोसले यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र आमदार रोहित पवार यांच्या सूचनेनुसार भोसले यांनी सोमवारी अर्ज मागे घेतला. जामखेडमधून राष्ट्रवादीचे भोसले व भाजपाचे राळेभात हे दोघेच मैदानात होते. राळेभात हे विखे यांचे कट्टर समर्थक आहेत. माजी मंत्री राम शिंदे हे राळेभात यांना सूचक आहेत. जामखेडमध्ये पवार व शिंदे यांच्यात कडवा संघर्ष आहे. असे असताना राष्ट्रवादीने जामखेडमधून सपशेल माघार घेतली. शेवगाव व पाथर्डी हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राजळे विरुद्ध ढाकणे व घुले, असा राजकीय संघर्ष आहे. परंतु, पाथर्डी तालुक्यातून राष्ट्रवादीकडून राजळे यांच्याविरोधात सक्षम उमेदवार दिला गेला नाही. राजळे यांच्याविरोधात एकमेव मथुराबाई संभाजी वाघ यांचा अर्ज होता. तोही अर्ज वाघ यांनी मागे घेतला. त्यामुळे राजळे बिनविरोध संचालक झाल्या आहेत. शेवगाव तालुक्यातही राजळे व घुले यांच्यात राजकीय संघर्ष आहे. परंतु, भाजपाच्या राजळे यांनीही राष्ट्रवादीचे माजी आमदार घुले यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. त्यामुळे घुले हे बिनविरोध संचालक झाले. राहात्याचे अण्णासाहेब म्हस्के यांच्याविरोधात तर एकही अर्ज नव्हता. त्यामुळे ते म्हस्के बिनविरोध संचालक झाले. निवडणुकीपूर्वीच भाजपाच्या संचालकांची संख्या तीन झाली आहे. महाविकास आघाडीचे घुले हे एकमेव बिनविरोध संचालक झालेले आहेत.
.....
मी विखेंचाच, विखेंचाच राहणार
राष्ट्रवादीचे सुरेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे जगन्नाथ राळेभात यांचे चिरंजीव सुधीर राळेभात म्हणाले, की स्थानिक पातळीवर तालुक्यांच्या विकासासाठी आम्ही आमदार रोहित पवार यांच्यासोबत आहोत. परंतु, आम्ही विखे गटाचेच आहोत. आणि विखे यांच्यासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेस दत्ता वारे, जगन्नाथ राळेभात व त्यांचे चिरंजीव अमोल व सुधीर उपस्थित होते.
...
पिता- पुत्रांचा निर्णय विखेंवर
जामखेडमधून विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपाचे जगन्नाथ राळेभात व त्यांचे चिरंजीव अमोल यांचे अर्ज दाखल आहेत. राळेभात यांच्याविराेधातील सुरेश भोसले यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राळेभात हे बिनविरोध झाले आहेत. परंतु, मुलगा की स्वत: जगन्नाथ राळेभात, याबाबतचा निर्णय खासदार डॉ. सुजय विखे यांच्याशी चर्चा करून घेतला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
....
रोहित पवार म्हणतात राळेभात आमचेच
आमदार रोहित पवार हेही सोमवारी नगर शहरातच होते. राष्ट्रवादीच भोसले यांचा अर्ज मागे घेतल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, स्थानिक पातळीवर तालुक्याच्या विकासासाठी राळेभात हे राष्ट्रवादीसोबत असतील, असा विश्वास आहे.