तीन बालके कुपोषित, बारा जणांचे वजन कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:19 AM2021-03-14T04:19:47+5:302021-03-14T04:19:47+5:30
शेवगाव : येथील डोंबारी वस्तीवरील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघाला असतानाच, नवा प्रश्न समोर आला आहे. तालुका आरोग्य विभागाच्या ...
शेवगाव : येथील डोंबारी वस्तीवरील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघाला असतानाच, नवा प्रश्न समोर आला आहे. तालुका आरोग्य विभागाच्या वतीने शून्य ते चौदा वयोगटातील २७ बालकांच्या केलेल्या आरोग्य तपासणीत तिघे कुपोषित तर १२ जणांचे वजन प्रमाणापेक्षा कमी भरले. येथील वस्तीवरील नागरिक, मुलांच्या अवस्थेबाबत सर्वप्रथम ‘लाेकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
तालुक्यातील विविध ठिकाणच्या वाड्या-वस्त्यांवर किती बालके कुपोषित असतील, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या भेटीदरम्यान डोंबारी वस्तीवर शाळाबाह्य विद्यार्थी, वीज, पाणी आदी समस्या प्रामुख्याने समोर आल्या होत्या. त्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मार्गी लागला असताना, त्याचवेळी तालुका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या आरोग्य तपासणीत तीन बालके कुपोषित आढळून आली आहेत. १२ बालकांचे वजन प्रमाणापेक्षा कमी भरले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पोषण आहार वाटप करतेवेळी ही बाब दिसून आली नाही, हे विशेष.
पोषण आहार वाटप करताना संबंधित बालकांचे वजन घेणे बंधनकारक आहे. वाटपावेळी प्रकृती खालावलेल्या बालकांचे कमी होत असलेले वजन संबंधितांना दिसले कसे नाहीत, हा प्रश्न उपस्थित होतो.
तालुक्यातील एकाच वस्तीवर तीन बालके कुपोषित आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या किती, इतके दिवस पोषण आहार वाटप करताना बालकांचे वजन घेतले होते का, घेतले होते तर त्यावेळी कुपोषित बालके का आढळून आली नाहीत, खरंच पोषण आहाराचे वितरण होते का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभागाची चार पथके असून, त्यांना तालुक्यात सर्वेक्षण करताना फिरण्यासाठी चार चारचाकी वाहने दिलेली आहेत. या विभागात डॉक्टरांसह १७ ते १८ जण कार्यरत आहेत. मग हे पथक कुठे असते, कधी सर्वेक्षण करते हा प्रश्न आहे.
---
पुरवठा अधिकारीही पोहोचले वस्तीवर..
डोंबारी वस्तीवर जाऊन पुरवठा विभागाचे प्रभारी पुरवठा निरीक्षक एस. एम. चिंतामण व अनिल बडे यांनी शिधापत्रिकांची पाहणी केली. तेथील लोकांना स्वस्त धान्य मिळते का, किती जणांकडे कोणते रेशनकार्ड आहे, याची माहिती गोळा केली. यावेळी तेथील लोकांनी अन्य स्वस्त धान्य दुकानांशी आम्हाला जोडले जावे, अशी मागणी केली. तिथे राहणाऱ्या बहुतेक कुटुंबांकडे केशरी रंगाचे रेशनकार्ड मिळून आले तर पाच ते सहा कुटुंबाकडे कोणतेही कार्ड नव्हते. याबाबतचा तपासणी अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे चिंतामण यांनी सांगितले.
---
पिवळे रेशनकार्ड द्या..
येथील कुटुंबीयांना पिवळे रेशनकार्ड मिळावे, अशी मागणी मनसेचे तालुका प्रमुख गणेश रांधवणे यांनी केली आहे. तसेच तालुक्यातील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण व्हावे, अशीही मागणी केली आहे.