बोल्हेगाव परिसरात तीन कंटेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:19 AM2021-03-14T04:19:58+5:302021-03-14T04:19:58+5:30
अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेने ज्या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील, तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून ...
अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेने ज्या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील, तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी (दि. १२) घेण्यात आला होता. त्यानुसार नगर शहरातील बोल्हेगाव परिसर, गणेश चौक व राघवेंद्र स्वामी मंदिर परिसर अशी तीन ठिकाणे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. शनिवारी (दि. १३) दुपारी दोन वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून, २६ मार्चपर्यंत हा आदेश लागू राहणार असल्याचे महापालिका आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.
महापालिका हद्दीतील बोल्हेगाव भागातील राघवेंद्र स्वामीनगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर्स ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागात नागरिकांचे आगमन, प्रस्थान, वाहनांचे अवागमन यांवर प्रतिबंध असेल.
कंटेन्मेंट झोनमधील सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा २६ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानुसार या भागात सर्व उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात नागरिकांना अत्यावश्यक वस्तू सशुल्क पुरविण्यात येणार आहेत. या भागात बँकिंग सुविधाही पुरविण्यात येतील. दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.
--------
असे आहे कन्टोन्मेंट झोन
१) राघवेंद्र स्वामीनगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर्स ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत. या भागात मयूर उकांडे यांच्या घराशेजारील रस्ता बंद करण्यात आला आहे.
२) बोल्हेगाव गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदिकैलास-बी इमारत. या भागात आदिकैलास या इमारतीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
३) बोल्हेगाव मनोलीलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांचे घर हा परिसर. या भागात बोल्हेगाव, मनोलीलानगर येथील डहाळे ज्वेलर्स या दुकानाशेजारील रस्ता बंद करण्यात आला आहे.