नेवासा तालुक्यातील घोगरगाव शिवारात तीन दरोडेखोरांना अटक, दोघे पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 08:10 PM2018-05-22T20:10:24+5:302018-05-22T20:10:45+5:30
तालुक्यातील घोगरगाव शिवारात घुमनदेव ते जुने घोगरगाव या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर दोन जण पसार झाले.
नेवासा : तालुक्यातील घोगरगाव शिवारात घुमनदेव ते जुने घोगरगाव या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर दोन जण पसार झाले. दरोडेखोरांकडून लोखंडी गज, लाकडी काठी, मिरची पूड व मोटारसायकल जप्त करण्यात आली. सर्जेराव पंढरीनाथ प-हाड (वय-४०), विकास सर्जेराव प-हाड (वय-१९), शिवनाथ ज्ञानदेव आव्हाड (वय-२५) (सर्व राहणार घोगरगाव ता. नेवासा) यांना अटक केली असून त्यांच्याकडून लोखंडी गज, लाकडी काठी, मिरची पूड तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तर विजय सुखदेव फुलारी (रा. घोगरगाव ता. नेवासा) व फयाज इनामदार (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) हे दोघे फरार झाले आहेत.
पोलीस नाईक जयवंत तोडमल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री गस्त व आॅल आऊट स्कीम सुरू असताना पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस रेवणनाथ मरकड, चालक कु-हाडे सरकारी वाहनातून नेवासा परिसरात गस्त घालत असतांना घोगरगाव गावच्या शिवारात घुमनदेव ते जुने घोगरगाव रस्त्यालगत असलेल्या बशीरभाई यांच्या विटभट्टीजवळ चार ते पाच जण इसम हातात गज व काठ्या घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले आहेत अशी माहिती मिळली. त्यानंतर घोगरगाव शिवारात बशीरभाई विटभट्टीच्या जवळ पुलाच्या कठड्यावर पाच जण तोंडाला रुमाल लावून हातात काठी घेऊन मोटारसायकल सह लपून बसलेले आढळून आल्यानंतर जागेवर पकडले. मात्र त्यातील दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पाच जणांविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला भा. द. वि. कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.