वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीवरील तिघांना चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 09:26 PM2019-01-13T21:26:46+5:302019-01-13T21:27:27+5:30
वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अहमदनगर - वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी शिवारात रविवार संध्याकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह चार तास जागीच पडून होते.
याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की, रविवारी एक तरुण आईला खडकवाडी येथे दवाखान्यात उपचारासाठी आणून उपचारानंतर नागापूरवाडी(पळशी)घराकडे परतत होता. त्यांना रस्त्यात एक वृद्ध महिला वारकरी भेटली असता तिला पण त्यांनी मोटारसायकलवर बसवले. दरम्यान, खडकवाडी शिवारात अवघ्या दोन कि.मी.वर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या बिगरनंबरच्या वाळूच्या डंपरने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. त्यानंतर हा डंपर अंगावरून गेल्याने दुचाकीवरील तिघाही जणांचा जागीच मृत्यू झाला.
या मृतांमध्ये गोरक्ष कोंडीभाऊ मेंगाळ (४०), त्यांची आई बुधाबाई कोंडीभाऊ मेंगाळ (६८) दोघे रा.नागापूरवाडी(पळशी), तर कामटवाडी येथून अखंड हरिनाम सप्ताह आटोपून वनकुटे परतत असलेल्या वृध्द वारकरी महिला सुमनबाई पंढरीनाथ डंबे (७५) रा.वनकुटे,ता.पारनेर यांचा सामावेश आहे.
घटना घडल्यानंतर नागापूर (पळशी) व खडकवाडी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू करून जोपर्यंत तहसीलदार,प्रांताधिकारी व पोलिस निरीक्षक येत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही असा पावित्रा घेतला. त्यामुळे परिसरात वाळू तस्करांविरोधात वातावरण तापले होते. दरम्यान, तीन तासांनी पारनेरचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोथरे व बालाजी पदमने घटनास्थळी आले. जोपर्यंत आरोपीला पकडत नाही. तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही असा पावित्रा स्थानिकांनी घेतल्याने पोलिसांनाही वरिष्ठांशी संपर्क केला. मात्र तब्बल चार तासानंतर तहसीलदार गणेश मरकड घटनास्थळी पोहोचले.