श्रीरामपूरच्या कुख्यात तिघा दरोडेखोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:16 PM2018-03-12T22:16:30+5:302018-03-12T22:17:54+5:30
अहमदनगर : दरोडा, खून, रस्तालूट अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तिघा अट्टल दरोडेखोरांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे व अकलूज परिसरात छापा टाकून गजाआड केले़ या तिघांवर मोक्कातंर्गत कारवाई झालेली आहे़
श्रीरामपूर/अहमदनगर : दरोडा, खून, रस्तालूट अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तिघा अट्टल दरोडेखोरांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे व अकलूज परिसरात छापा टाकून गजाआड केले. या तिघांवर मोक्कातंर्गत कारवाई झालेली आहे.
निलेश बाळासाहेब परदेशी (वय २७), विक्रम उर्फ विकी नारायणश्री परदेशी (वय २८) व भक्ती उर्फ भगत भागवत काळे (वय २८, तिघेही रा. खैैरीनिमगाव, ता.श्रीरामपूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत़ निलेश परदेशी याने श्रीरामपूरजवळील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. पोलिसांनी सदर मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आरोपी निलेश परदेशी व विक्रम परदेशी हे मुंबई परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ पवार यांच्यासह पथकाने नालासोपारा परिसरात सापळा लावून निलेश व विक्रम यांना ताब्यात घेतले़ तिसरा आरोपी भक्ती उर्फ भगत काळे याला अकलूज (जि़ सोलापूर) येथून शिताफीने ताब्यात घेतले. या तिघा आरोपींनी नारायणगाव, लोणावळा व नवी मुंबई येथील सिगारेटचे कंटेनर लुटले होते़ यातून त्यांनी कोट्यवधी रूपये कमावले होते. या गुन्ह्यात नवी मुंबई पोलीस आरोपींचा शोध घेत होते़ हे आरोपी मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते़ सदर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत पथवे आदी उपस्थित होते. आरोपींना पकडण्याची कारवाई पवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक डॉ़ शरद गोर्र्डे, कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, उमेश खेडकर, नानेकर, रवींद्र कर्डिले, शंकर चौधरी आदींच्या पथकाने केली. दरम्यान अल्पवयीन मुलीची सुटका केल्याने त्या गावातील ग्रामस्थांनी पोलिसांचा सत्कार केला.
श्रीरामपुरातील गुन्हेगारीचा सफाया
आरोपी निलेश साबळे परदेशी याच्यावर श्रीरामपूरसह लोणावळा व नवी मुंबई पोलीस ठाण्यात ११ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. विक्रम परदेशी व भक्ती काळे यांच्यावरही श्रीरामपूरसह शिर्डी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दहा ते अकरा गुन्हे दाखल आहेत.