श्रीगोंद्यात तिच तीन घराणी ! झेंडे मात्र बदलणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 04:54 PM2019-07-27T16:54:41+5:302019-07-27T16:58:32+5:30
विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मतलबी वारे जोराने वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांची भाजपाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय पक्षांच्या उमेदवारींची समीकरणे बदलणार का? यावर चर्चा झडत आहेत.
भाजपाकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. २०१४ मध्ये पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला होता. श्रीगोंद्यातील काही विखे समर्थकांनी आमदार राहुल जगताप यांना भाजपात आणण्यासाठी विखे, पिचड आणि दानवे यांच्या माध्यमातून फिल्डींग लावली आहे.
नुकतेच अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य साखर संघावर राजेंद्र नागवडे आणि घनश्याम शेलार यांना संधी देऊन राष्ट्रवादी उमेदवारासाठी तटबंदी मजबूत करण्यासाठी व्यूहरचना आखली. मात्र त्याचा फायदा निवडणुकीत कितपत होईल, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये घेतलेल्या मुलाखतीला आमदार राहुल जगताप उशिरा गेले. त्याचवेळी त्यांच्या पक्षांतराबाबत शंकेची पाल चुकचुकली. त्याचवेळी राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनीही राष्ट्रवादीचा इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पाचपुतेंना भाजपाची उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि मंत्री पदासाठी काटाकाटीच्या राजकारणात काहीही घडू शकते.
भाजपाने आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी दिली तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना पुन्हा एकदा वेगळे चिन्ह घेऊन निवडणुकीस सामोरे जावे लागेल. आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे श्रीगोंद्याच्या आखाड्यात पाचपुते, जगताप आणि नागवडे या दिग्गज घराण्यात लढाई रंगणार आहे.
कमळ आणि अपयश
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत यापूर्वी माजी खासदार दिलीप गांधी, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या रुपाने भाजपाला मताधिक्य दिले. पण एकाही विधानसभा निवडणुकीत भाजपाला श्रीगोंदेकरांनी स्वीकारले नाही. राजेंद्र नागवडे, बबनराव पाचपुते यांना भाजपाकडून उमेदवारी केली पण त्यांनाही जनतेने नाकारले. आता कमळ कुणाच्या पदरात पडते यावर उत्सुकता राहणार आहेत.