चोरीच्या तयारीत असलेले तिघे गजाआड; गस्त घालताना कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 02:23 PM2020-05-19T14:23:01+5:302020-05-19T14:23:27+5:30
कोपरगाव शहरालगत असलेल्या कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सोमवारी (दि.१८ मे) रात्री गजाआड केले आहे.
कोपरगाव : शहरालगत असलेल्या कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सोमवारी (दि.१८ मे) रात्री गजाआड केले आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील हवालदार अंबादास वाघ हे पथकासह गस्तीवर होते. यावेळी कोपरगाव औद्योगिक वसाहतीमधील सिनगर स्टील फर्निचर कंपनीच्या भिंतीचे आडोशाला नकुल माणिकराव जाधव (वय ३० रा. चिचोंडी, ता.येवला, जि. नाशिक), द्वारकामाई दूध कंपनीच्या भिंतीचे आडोशाला किरण सजन बोथरा (वय ३२, रा. औद्योगीक वसाहत, कोपरगाव) व बी.डी.एच कंपनीच्या भिंतीच्या आडोशाला संजय खंडू घोडेराव (वय ३४, रा.संजिवनी गेटसमोर, शिंगणापूर, ता.कोपरगाव) हे तिघे अंधाराचा फायद घेत तोंडाला रुमाल बांधून वरील ठिकाणी चोरी करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी करुन त्यांच्याविरुध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. दरम्यान गेल्या तीन चार दिवसापासून कोपरगाव शहरात व परिसरात चोºयांचे मोठ्या प्रमाणात सत्र सुरु आहे. सोमवारी मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरी करण्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी जेरबंद झाल्याने पोलिसांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.