संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:00 PM2020-06-01T13:00:24+5:302020-06-01T13:01:01+5:30
शेळकेवाडी (ता. संगमनेर) येथे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला. यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घारगाव : शेळकेवाडी (ता. संगमनेर) येथे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला. यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रविवारी संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथे जयेश काशिनाथ शेळके यांच्या गोठ्यातील गायी व शेळ्यांवर बिबट्याने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हल्ला केला.
शेळ्यांनी आरडाओरडा केल्याने शेळके यांना जाग आली. बॅटरी चमकविल्याने बिबट्याने धूम ठोकली. यामध्ये ३ शेळ्यांचा मृत्यू झाला. वनपाल रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे दिलीप बहिरट, सविता थोरात, दीपक वायळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याच्या ठश्यावरून दोन बिबटे असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी बबन भिकाजी डोंगरे यांच्या गायी व शेळ्यांच्या गोठ्यात प्रवेश करीत एक शेळी ठार केली होती. कारभारी महादू यादव यांच्याही वासरावर बिबट्याने हल्ला केला होता. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.