तांदूळ विक्री प्रकरणातील मुख्य तीन आरोपी फरार; दहा रेशन दुकाने पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 01:00 PM2020-06-09T13:00:46+5:302020-06-09T13:01:34+5:30
जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदुळाचा ट्रक काळ्या विक्री करण्यासाठी जात असताना चोंडी शिवारात पोलिसांनी २८ मे रोजी पकडला होता. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
जामखेड : तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदुळाचा ट्रक काळ्या विक्री करण्यासाठी जात असताना चोंडी शिवारात पोलिसांनी २८ मे रोजी पकडला होता. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
तांदूळ हा फक्त सोनेगाव येथील दुकानाचा नाही तर यामध्ये तालुक्यातील आणखी आठ ते दहा दुकानातील असावा, असा पोलिसांचा कयास आहे. यामुळे आणखी दहा स्वस्त धान्य दुकाने पोलिसांच्या रडारवर आहेत.
२८ मे रोजी ट्रक चालक शशीकांत भिमराव गवळी, सहचालक संदीप सुनील लोंढे, सुभाष नारायण दहिटणकर, सेल्समन सुग्रीव वायकर व दुकान चालक मंदा वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी स्वस्त धान्य दुकानदार व तिचा पती यांचा शोध पोलिसांकडून मागील १५ दिवसापासून घेतला जात आहे.
पुरवठा अधिकारी रवींद्र बोरकर यांनी सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील तपासणी केली असता तेथील २४ टन तांदूळ नसून अन्य ८ ते १० स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे सांगितले होते. त्यानुसार इतर संशयित असलेल्या दुकानदारांना बोलावून घेण्यात आले होते. परंतु यानंतर सर्व काही गुलदस्त्यात राहिले आहे.
प्रमुख आरोपी पोलिसांना मिळत नसल्याने इतर स्वस्त धान्य दुकानदारांना आरोपी करता येत नाही.