ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास
By शेखर पानसरे | Published: October 11, 2023 07:24 PM2023-10-11T19:24:53+5:302023-10-11T19:25:28+5:30
ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास आणि २० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
संगमनेर : ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास आणि २० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी बुधवारी (दि.११) हा निकाल दिला. दत्तात्रय विठ्ठल गोंदके (रा. करंडी, ता. अकोले) असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
२ सप्टेंबर २०२१ ला सकाळी ११ वाजेच्या सुमारास करंडी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक सोमा मुरलीधर येडे यांना मारहाण झाली होती. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक येडे यांच्यासह पाणीपुरवठा कर्मचारी शशिकांत गोंदके, शिपाई विठ्ठल गोंदके, रोजगार सेवक सोमनाथ वायाळ हे दैनंदिन कामकाज करत होते. रोजगार हमी योजनेची शिवार फेरीचे सर्वेक्षण असल्याने ग्रामसेवक येडे आणि कृषी सहायक अनिल फापाळे यांना गावात जायचे होते. त्याच दरम्यान करंडी गावातील दत्तात्रय विठ्ठल गोंदके हा ग्रामपंचायत कार्यालयात आला. ग्रामसेवक येडे यांना एक अर्ज तो देऊ लागला. सर्वेक्षण करण्यासाठी गावात जायचे आहे, ते झाल्यानंतर मी तुम्हाला माहिती देतो, असे ग्रामसेवक येडे म्हणाले. परंतू गोंदके हा ऐकण्याच्या मनस्थितीत नसताना ग्रामसेवक येडे हे बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याने बाहेरून ग्रामपंचायतीचे कार्यालयाचा दरवाजा लावून घेतला.
दोन तास दरवाजा बंद होता. त्यानंतर ग्रामसेवक येडे बाहेर जात असताना त्याने त्यांच्या छातीत जोरात लाथ मारली, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी तपास करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायाधीश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यात सरकारी वकील म्हणून ॲड. मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. साक्षीदार तपासण्यात आले. ॲड. गवते यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपी दत्तात्रय गोंदके याला शिक्षा सुनावली. ॲड. गवते यांना पोलिस हेड कॉस्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉस्टेबल प्रतिभा थोरात, नयना पंडित, स्वाती नाईकवाडी, दीपाली दवंगे यांचे सहकार्य लाभले.