आणखी तीन पाहुणे आले कोरोना घेऊन, दिवसभरात आठ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:39 PM2020-05-25T21:39:08+5:302020-05-25T21:39:15+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या दोन आणि पुण्याहून आलेल्या एक अशा तीन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीनसह सोमवारी दिवसभरात एकूण आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या दोन आणि पुण्याहून आलेल्या एक अशा तीन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीनसह सोमवारी दिवसभरात एकूण आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित ४३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या १६ व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७५ इतकी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
मुंबईतील वरळी येथून पिंपळगाव लांडगा येथे आलेला ६२ वर्षीय व्यक्ती, विक्रोळी ( मुंबई ) येथून संगमनेर येथे आलेली ६८ वर्षीय महिला आणि घोरपडी ( पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी येथे आलेला ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बाहेरील जिल्हयातून आलेल्या आतापर्यंत एकूण १६ व्यक्ती बाधीत आढळून आले आहेत.
----------
आतापर्यंत ५४ जणांना डिस्चार्ज
आतापर्यंत ५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या आपल्या येथे २६ तर नाशिक येथे तीन रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सात आणि बाहेरील जिल्ह्यातील एक असे आठ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.