तीन महिन्यात तिघींचा खून : प्रेमकहाणीचं दुर्दैव
By अरुण वाघमोडे | Published: May 14, 2019 11:10 AM2019-05-14T11:10:24+5:302019-05-14T11:16:16+5:30
आरती पांडुरंग सायगुडे, प्रतिभा देवेंद्र कोठावले व रुक्मिणी मंगेश रणसिंग या तिघी जणी... तसे यांच्या नावात काहीच साम्य नाही
अरुण वाघमोडे
अहमदनगर : आरती पांडुरंग सायगुडे, प्रतिभा देवेंद्र कोठावले व रुक्मिणी मंगेश रणसिंग या तिघी जणी... तसे यांच्या नावात काहीच साम्य नाही मात्र, अल्पशा आयुष्यातच त्यांच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवात खूप काही साम्य आहे. या तिघींची मागील तीन महिन्यांत निर्घृण हत्या झाली. या हत्या कुणी बाहेरच्यांनी नव्हे तर त्यांच्याच नातेवाईकांनी केल्या. या हत्येंची कारणही सारखीच. ती म्हणजे खोटी प्रतिष्ठा अन् पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा...
तीन महिन्यातील पहिली घटना मार्च महिन्यात जामखेड तालुक्यात घडली. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे 17 वर्षांची आरती सायगुडे हिचा दुर्देवी अंत झाला. वडील आणि दोघा मामांनी आरतीची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळून टाकला. 29 मार्च रोजी ही घटना उघडकीस आली अन पोलिसांनी आरोपींना अटक केले. कारण काय तर म्हणे, कॉलेजमधून येताना आरती एका तरुणाच्या मोटारसायकलवर बसून आली होती. या इतक्या शुल्लक कारणातून आरतीची तिच्याच पित्याने हत्या केली.
दुसरी घटना नेवासा तालुक्यात एप्रिल महिन्यात घडली. आंतरजातीय विवाह केला म्हणून नेवासा तालुक्यातील कौठा येथे 24 वर्षीय प्रतिभा देवेंद्र कोठावले (सासरचे नाव) या विवाहित मुलीचा तिच्याच माता-पित्यांनी खून करून अंत्यसंस्कारही केले. 28 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलीचे वडील ब्रह्मदेव रमाजी मरकड व आई आशा यांच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. प्रतिभा ही सुशिक्षित होती. मेडिकल दुकानात नोकरी करत होती तर तिचा पती देवेंद्र हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न त्यांनी पाहिले. मात्र घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले. लग्नानंतर घरच्यांनी मुलीशी संपकत्र साधत थाटामाटात आम्ही लग्न लाऊन देतो, असे सांगत माहेरी बोलावून घेतले. मोठ्या अपेक्षेने प्रतिभा माहेरी आली. माहेरातच तिचा घात झाला अन् एक प्रेमकहाणी अर्ध्यावरच संपली.
तिसरी घटना पारनेर तालुक्यात नुकतीच घडली. निघोज येथील 19 वर्षीय रुक्मिणी रणसिंग हिच्या आयुष्याचाही असाच दुर्दैवी अंत झाला. गावातीलच मंगेश याच्याशी प्रेमविवाह केला. विवाहानंतर मात्र मंगेश याने तिचा छळ सुरू केला. नव-याच्या त्रासाला कंटाळून माहेरी आलेल्या रुक्मिणीला तिच्या पतीने जाळून मारले.
प्रतिष्ठा, शंका, छळ अन अंत
आरती सायगुडे हिची पे्रमकहाणी तिच्या पित्याच्या मनातील कल्पना होती. या कल्पनेलाच त्याने खरे मानून खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीचा बळी घेतला. प्रत्यक्षात आरती आणि त्या मोटारसायकलवाल्या मुलाचा काही संबंध नव्हता. प्रतिभा हिच्या प्रेमकहाणीत तिचे माता-पिता खलनायक ठरले तर रुक्मिणीचा प्रियकरच घातकी निघाला. चारित्र्याच्या संशयावरून त्याने रुक्मिणीचा शेवटपर्यंत छळ केला.
‘‘माता-पित्यांनी मुलांशी सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे. मुले विशिष्ट वयात आल्यानंतर त्यांच्याशी मित्रासारखे रहावे. त्यांच्या भावभावना समजून घ्याव्यात. चांगल्या-वाईट बाबींची त्यांना समज द्यावी. घरातील मुलीने अचानक तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला तर अशावेळी चर्चेतून मार्ग काढावेत. समाज काय म्हणेल या मानसिकतेतून अथवा चुकीच्या माहितीतून कुठलाही गुन्हा करू नये.’’ असे दिलासा सेलच्या प्रमुख कल्पना चव्हाण यांनी सांगितलं.