बालमटाकळीतील ‘थ्री इन वन’ लग्नसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:27+5:302021-02-23T04:31:27+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे रविवारी (दि.२१) एकाच कुटुंबातील तीन मुलींचा लग्नसोहळा एकाच मांडवात पार पाडत वधू पक्षाकडून ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे रविवारी (दि.२१) एकाच कुटुंबातील तीन मुलींचा लग्नसोहळा एकाच मांडवात पार पाडत वधू पक्षाकडून अंधश्रद्धेला मूठमाती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच तिन्ही मुली सख्ख्या तीन बहिणींच्या घरातच सुना म्हणून देत नात्यातील ऋणानुबंधदेखील दृढ केले आहेत.
सामुदायिक विवाह सोहळ्यात एकाच मांडवात एकाहून अधिक वधू-वरांचे पार पडलेले लग्न व त्यांचे गुण्यागोविंदाने चालणारे संसार आपण पाहतो. परंतु, ग्रामीण भागात अजुनही एकाच मांडवात अधिक लग्नविधी करण्याचे टाळले जाते. याबाबतच्या अनेक तथ्यहीन अंधश्रद्धा जुन्या पिढीतील लोकांकडून ऐकण्यास मिळतात. मात्र अशा अंधश्रद्धाळू चालीरितींना बालमटाकळी येथील रहिवासी असलेल्या नामदेव दत्तात्रय घाडगे (वय ४६) यांनी मूठमाती दिली आहे. तसेच प्रत्येक मुलीसाठी वेगवेगळा लग्नविधी सोहळा ठेवून होणाऱ्या खर्चालाही पायबंद घातला आहे. अनेकदा कुटुंबातील दोन-तीन मुलींचे वेगवेगळे लग्नसोहळे पार पाडून सर्वसामान्य वधुपित्याचे कंबरडे मोडते. तर अनेकजण यात कर्जबाजारी झाल्याचे पाहायला मिळते. अशावेळी घाडगे परिवाराने तीन मुलींचा केलेला हा विधिवत ‘थ्री इन वन’ लग्नसोहळा समाजापुढे आदर्शवत ठरत आहे. नामदेव घाडगे यांना तीन मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपल्या तीनही मुलींचे लग्न बीड जिल्ह्यातील बोरी पिंपळगाव (ता.गेवराई), शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव व बाडगव्हाण येथील शेतकरी कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींच्या मुलांसोबतच जुळवून एकाचवेळी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी त्यांच्या प्रणाली, प्रगती व प्रतीक्षा या तीन मुलींचा लग्नसोहळा पार पडला. सध्या परिसरातून या सामाजिक परिवर्तनशील लग्नाचे कौतुक होत आहे.