मजुरांच्या हल्ल्यात तीन पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:05 AM2018-11-23T11:05:52+5:302018-11-23T11:06:07+5:30
शिरूर-बेलवंडी रस्त्यावर बेलवंडी शिवारात शिंदेवाडी जवळ रस्त्याचे काम सुरू असताना वाहनास साईड देण्यावरून गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस व कामावरील मजुरांमध्ये तुफान हाणामारी झाली.
श्रीगोंदा : शिरूर-बेलवंडी रस्त्यावर बेलवंडी शिवारात शिंदेवाडी जवळ रस्त्याचे काम सुरू असताना वाहनास साईड देण्यावरून गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस व कामावरील मजुरांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात पोलिसांच्या जीपच्या काचा फुटल्या. तीन पोलीस जखमी झाले.
पुणे जिल्ह्यातील खेडचे पोलीस तपास कामानिमित्त कर्जतला चालले होते. शिंदेवाडी येथे रस्त्याचे काम सुरू आहे. याठिकाणी पुढे जाण्यासाठी पोलिसांनी सरकारी जीप रस्त्यावर घातल्यानंतर मजुरांची व पोलिसांची बाचाबाची झाली. त्यातून दोघांमध्ये हाणामारी होऊन पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.
तीन पोलिसांना रस्त्यात अडवून मारहाण करून सरकारी वाहनाच्या काचा फोडल्याची तक्रार पोलिसांनी दिली आहे. रात्री उशिरा ठेकेदार सतीश धावडे याच्यासह ४२ जणांविरुध्द याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या मजुरांना पोलिसांनी मारहाण करूनही आमच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जातो, हाच बेलवंडी पोलिसांचा न्याय आहे का?असा सवाल रस्त्याचे काम करणारे ठेकेदार सतीश धावडे यांनी केला. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती घेतली.