गावठी कट्ट्यासह तिघे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:28 AM2021-02-27T04:28:26+5:302021-02-27T04:28:26+5:30
शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तिघांना पाठलाग करून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या ...
शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तिघांना पाठलाग करून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने ताब्यात घेत तिघांना अटक केली आहे.
कृष्णा बाबासाहेब गुंड ( वय २३ रा. अरणगाव, ता. नगर ), नवाज रौफ सय्यद ( वय २० रा. माळीवाडा, नगर ), विकास दिलीप खरपुडे (वय ३० रा. बुरुडगाव रस्ता, नगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भातकुडगाव फाट्याजवळ गुरुवारी (दि.२५) तीनजण दुचाकीवरुन गावठी बनावटीचा कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांना
मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस नाईक नारायण बडे, पोलीस कर्मचारी वसंत फुलमाळी, संदीप बर्डे, कैलास पवार, विकी पाथरे आदींच्या पथकाने सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास भातुकडगाव मार्गे विना क्रमांक येणाऱ्या दुचाकीवरील तिघांचा संशय आल्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुचाकी जागेवर सोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. गावठी कट्टा, दोन जिंवत काडतुसे, दुचाकी असा २ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.