पेट्रोल पंपाची रोकड लुटणारे तिघे जेरबंद
By Admin | Published: May 14, 2017 07:25 PM2017-05-14T19:25:06+5:302017-05-14T19:26:11+5:30
सव्वा सात लाख रुपये पल्सरवरुन आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लंपास केली.
आॅनलाईन लोकमत
संगमनेर (अहमदनगर), दि़ १४ - तालुक्यातील कऱ्हे घाटानजीक निमोण येथील साईसिध्दी पेट्रोल पंपाची रक्कम संगमनेर येथे बँकेत भरणा करण्यासाठी दोन कर्मचारी जात असताना त्यांच्याकडील सव्वा सात लाख रुपये पल्सरवरुन आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लंपास केली. ही घटना २ मे रोजी घडली होती. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, निमोण येथील श्रीकांत गोमासे यांच्या मालकीच्या साईसिध्दी पेट्रोल पंपाच्या रकमेचा भरणा संगमनेर येथील बँकेत भरण्यासाठी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक श्रीराम गेणू कर्डेल व सेल्समन संभाजी राजाराम तळप हे दोघे जण दि. २ मे रोजी ३ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून कऱ्हे घाट येथून जात असताना चौघा जणांनी पल्सर मोटारसायकलीवरुन येवून कर्डेल व तळप या दोघांना पिस्तुलाचा धाक दखवून दिवसाढवळ्या ७ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम व चाळीस हजार रुपयांचे चेक चोरुन चोरट्यांनी पोबारा केला होता. त्यानंतर घटनेची माहिती समजताच श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अजय देवरे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली होती. यासाठी शोधासाठी पथके नेमली होती. त्यानुसार जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने तिघा जणांना निमोण येथे पकडले. उर्वरित पाच जण अद्यापही फरार आहेत. त्यांचाही हे पथक कसून शोध घेत आहेत.