निळवंडेतून मिळणार शेतीसाठी तीन आवर्तने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:21 AM2018-11-22T11:21:52+5:302018-11-22T11:22:07+5:30
भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी तीन तर पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तनांचे नियोजन मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.
राजूर : भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी तीन तर पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तनांचे नियोजन मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.
भंडारदरा-निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर या धरणांमध्ये शिल्लक असणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार सुधीर तांबे, जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख आदी उपस्थित होते.
या दोन्ही धरणांमध्ये शिल्लक असणाºया पाण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. यात शेतीसाठी रब्बीचे नुकतेच एक आवर्तन सोडण्यात आले होते. यानंतर रब्बीसाठी दुसरे आवर्तन २० जानेवारी ते १५फेब्रुवारीच्या दरम्यान असणार आहे.
तर उन्हाळ्यात शेतीसाठी २० मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत असे एकूण शेतीसाठी तीन आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी एकूण चार आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.