पाणीटंचाईने घेतला तिघी माय-लेकींचा बळी : कर्जतमध्ये शेततळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 06:33 PM2019-06-16T18:33:08+5:302019-06-16T18:33:13+5:30
घुमरी गावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुली आणि आई यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.
कर्जत : घुमरी गावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुली आणि आई यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या दिवशीच दुदेर्वी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आज सकाळी घुमरीयेथील अनिता शरद पांडुळे (वय ३०), सायली शरद पांडुळे (वय १०) आणि सोनाली शरद पांडुळे (वय ७ वर्षे) या तिघी मायलेकी वटपौर्णिमा असल्याने सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब बापूराव पांडुळे यांच्या शेतातील शेततळ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. लहान मुलींचा खेळता- खेळता शेततळ््याच्या काठावरून तोल जाऊन पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्या बुडू लागल्या असता दोघींना वाचविण्यासाठी आई अनिता यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने अखेर तिघींचा शेततळयातील पाण्यात बुडून अंत झाला.
घटना समजताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेह पाहून नातेवाईकानी हंबरडा फोडला. सदर तिघीचा मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. भाऊसाहेब पांडुळे यांच्या खबरीवरून कर्जत पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
पाण्याची टंचाई
सध्या तालुक्यातील बहुतांश गावात पाणीटंचाईची परिस्थिती असल्याने पाणी उपलब्ध असणा-या ठिकाणी घरगुती धुन्यासाठी महिला आधार घेताना दिसत आहे. वटपौर्णिमेचा दिवस असल्याने सकाळी लवकर कामे उरकून सण साजरा करावा याविचाराने अनिता आणि त्यांच्या दोन्ही मुली धुणे धुण्यासाठी शेततळ््याववर गेल्या होत्या.