ग्रामीण आरोग्याचे तीन तेरा...

By Admin | Published: August 7, 2014 11:56 PM2014-08-07T23:56:57+5:302014-08-08T00:09:48+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात सरकारी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र ‘लोकमत’ने ग्रामीण भागात उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांत केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे.

Three Thirteen Rural Health ... | ग्रामीण आरोग्याचे तीन तेरा...

ग्रामीण आरोग्याचे तीन तेरा...

अहमदनगर : जिल्ह्यात सरकारी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र ‘लोकमत’ने ग्रामीण भागात उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांत केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून दरवर्षी सरकारी आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करते. मात्र, त्याचा लाभ गरजवंतांना मिळणार नसेल, वेळेवर रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार नसतील तर त्याचा उपयोग काय ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयापासून खेडेगावापर्यंत जागोजागी सरकारी आरोग्य यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे. मात्र, हे जाळे कधीच विरले असून सर्वसामान्यांना आरोग्य सेवेसाठी खासगी ठिकाणी उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे. सरकारने आतापर्यंत गरोदर माता, जन्माला येणारे बालक, अंगणवाडी बालक, शालेय बालक ते महाविद्यालयीन तरूणांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केलेली आहे. मात्र, या योजना जनतेसाठी मरणयातना देणाऱ्या ठरू पाहत आहेत.
जिल्ह्यात ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये अनेक ठिकाणी रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. अनेक ठिकाणी अधिकारी त्यांच्या अधिकारांचा दुरूपयोग करतांना दिसत आहे. जवळजवळ सर्वच ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव आहे.औषधांचा तुटवडा आहे. यंत्रणाच आजारी पडली आहे. उपचाराऐवजी रुग्णाला रेफर करण्यात येत असून अनेक ठिकाणी रुग्णालयात बेड नाही, गाद्या गायब आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी पदे रिक्त असल्याने अडचणी येत आहेत. मात्र, त्यावर उपाय काढण्यात येत असून चुकीचे ज्या ठिकाणी होत असेल, त्या ठिकाणी लक्ष देऊन करवाई करू. आरोग्य विभागातील कामकाजातील त्रुटी सोडविण्यावर भर देणार आहे.
-पी. बी. गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठिकाणी कठोर कारवाई करू . ग्रामीण भागात समोर येणाऱ्या त्रुटी सोडवण्यावर भर देणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करू.
-पी.एस. कांबळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक.
गुरूवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतलेला आहे. यात काही मुद्दे पुढे आलेले आहेत. ते सोडविण्यासाठी ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी ही यंत्रण कटिबध्द आहे. काही ठिकाणी अडचणी असू शकतील. त्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यात कोल्हापूर पॅटर्न राबविण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्याचा मानस आहे.
-शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.
आरोग्य सेवा सलाईनवर
शेवगाव : अस्वच्छता, दूषित पाणी यामुळे साथीचे आजारा फैलावल्याने तालुक्यात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे़ त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सध्या रुग्णांच्या वाढत्या गर्दीने हाऊसफुल्ल झाली आहेत. मात्र वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, अत्यावश्यक औषधींचा तुटवडा, इतर आवश्यक सोयी सुविधांची वाणवा तसेच आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागाबाबत संबंधितांचे होणारे दुर्लक्ष या सर्व कारणांमुळे तालुक्याची आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे दिसत आहे. तालुक्यात शेवगाव व बोधेगाव असे दोन ग्रामीण रुग्णालय शेवगाव, ढोरजळगाव, दहिगावने, भातकुडगाव, चापडगाव व हातगाव असे ६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ३७ आरोग्य उपकेंदे्र कार्यान्वित आहेत. तालुक्यातील लोकांचा आरोग्य दर्जा सुधारावा मृत्युदर, बालमृत्यू, अर्भकमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे. यासठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ तसेच सरकारी दवाखान्यातून ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेच्या संदर्भात तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या कामकाजाचा आढावा,लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी तालुक्यातील प्रातिनिधीक स्वरुपात काही ठिकणी भेटी देऊन माहिती घेतली असता ठिकठिकाणी विदारकचित्रदिसले. तालुक्याच्या जवळपास ३५ ते ४० गावांचे मुख्य केंद्र असलेल्या बोधेगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीपासून गेली दोन वर्ष पूर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जुन्या इमारतीतून सुरू आहे. येथे प्रथम श्रेणी वैद्यकीय अधिक्षकांचे पद अद्यापी रिक्त असून, वैद्यकीय अधिकारी वर्ग २ च्या ३ मंजूर जागापैकी डॉ.प्रताप देशमुख या एकमेव वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली बोधेगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या सुरू आहे. याठिकाणी रुग्णांची मोठी संख्या दिसून आली मात्र जागेच्या अभावामुळे एका कॉटवर दोन-दोन रुग्ण अशी विचीत्र अवस्था निदर्शनास आली. मनिषा गायकवाड, रूख्मिणी माळी, लहु गायकवाड, शंकर माळी आदी रुग्ण दाटीवाटीने एका कॉटवर दिसले़ बोधेगावचे शवविच्छदेन गृह मोडकळीस आले असून, गेल्या दोन -तीन वर्षापासून ते बंद अवस्थेत आहे़ शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात डोळ्यांच्या हॉस्पिटलसाठी सुरू करण्यात येणाऱ्या विशेष कक्षाच्या इमारतीचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे़ रुग्णांची संख्या वाढती आहे़ मात्र वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या तसेच आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात जाणवणारा अभाव यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी असून अडचण, नसून खोळंबा पद्धतीची बनल्याच्या तक्रारी आहेत. चापडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा गावांचा समावेश आहे़ या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक जागा गेल्या वर्षभरापासून रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या डॉ.गणेश पानसरे यांच्यावर अधिक ताण पडत आहे़ येथील आरोग्य उपकेंद्र फक्त शुक्रवारीच आठवडे बाजाराच्या दिवशीच सुरू असते. एरव्ही या ठिकाणी शुकशुकाट असतो़ तसेच आरोग्य उपकेंद्राचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने सध्या या ठिकाणी जाण्यास रस्ताच नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे़
कर्मचारी खासगी रुग्णालयात
अहमदनगर : सकाळी ९-३० वाजता खातगाव टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. वैद्यकीय अधिकारी आपल्या दालनात बसले होते. रुग्णांचा मात्र पत्ता नव्हता. चौकशी केली असता या केंद्रात १० कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. मात्र ४ कर्मचारीच उपस्थित असल्याने उर्वरित कुठे गेले? याची चौकशी केली असता शहरातील एका खासगी रुग्णालयात बिनटाक्याच्या शस्त्रक्रियासाठी गेल्याचे सांगण्यात आले. लॅब टेक्निशियन हिवरेबाजारला तपासणीसाठी गेले होते. या केंद्रात सर्पदंशाच्या १० व कुत्र्याच्या चाव्याच्या ३५ लसी उपलब्ध होत्या. या केंद्रात शवविच्छेदन कक्ष आहे. मात्र तेथे अजून एकही शवविच्छेदन झाले नाही. महिन्याला ४-५ प्रसूति होतात. टाकळी केंद्राचे थम्स बंद होते. सकाळी १०-१५ मिनिटांनी जखणगाव उपकेंद्राला भेट दिली असता तेथे दोन महिला कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. मात्र दोन्हीही कर्मचारी उपकेंद्रात नव्हत्या. चौकशी केली तर एक नगरमध्ये शिबिरासाठी व दुसरी कर्मचारी निमगाव वाघा येथे लसीकरणासाठी गेल्याचे सांगण्यात आले. या उपकेंद्रात रात्री निवासी कुणीच थांबत नाहीत. यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्याचे कळाले. सकाळी ११ वाजता चास येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे वैद्यकीय अधिकारी एस.व्ही. पाटील रुग्णांची तपासणी करत होते. तेथे १७ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आहेत. १० उपस्थित होते. बाकीचे सत्रानुसार कामे करतात. महिन्याला सात ते आठ प्रसूति होतात. रुग्णवाहिका उपलब्ध आहे. रात्रीच्या वेळी एक महिला कर्मचारी मुक्कामी असते. वैद्यकीय अधिकारी मात्र निवासी थांबत नाहीत. दुपारी १-३० मिनिटांनी मेहेकरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या बाराबाभळी उपकेंद्राला भेट दिली. तर हे उपकेंद्र बंद होते. सेविका केकती येथे लसीकरणासाठी गेल्याचे सांगण्यात आले.
सुविधांचा बोजवारा
जामखेड : नान्नज आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले़ तर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाल्याचे आढळून आले़ शवविच्छेदनासाठी अधिकारी नसल्याने येथे एकही शवविच्छेदन झाले नाही. नान्नज आरोग्य उपकेंद्राला भेट दिली असता प्रथम वैद्यकीय अधिकारी आढाव उपस्थित नव्हते. तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता वैद्यकीय अधिकारी आढाव आठवड्यातून तीन दिवस निवासस्थानी असतात.
रुग्ण सेवा नव्हे; अनागोंदी कारभार
नेवासा : नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू असून, रुग्णांना सेवा देण्यापेक्षा त्यांचे आर्थिक शोषणच होत असल्याचे निदर्शनास येते़ वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हुद्याचा रबरी शिक्का वर्ग दोनचा वैद्यकीय अधिकारी सर्रास वापरून वयाचे व तंदुरुस्त असल्याचा दाखला देऊन सर्रास पैशाची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले़ तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गालगत नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयातंर्गत अनेक गावे येतात़ दळण-वळणाच्या सुविधामुळे या रुग्णालयात दररोज २०० ते ३०० रुग्ण तपासणीसाठी व औषधोपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात वर्ग एक चे डॉ.सी.एल. यादव यांची नेमणूक असून, त्यांचे सहकारी म्हणून वर्ग दोनचे तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका आहेत. मात्र प्रत्यक्षात येथे वर्ग २ चे एकच अधिकारी असल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.संतोष बटुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे तर तिसरे वैद्यकीय अधिकारी गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी हजर झालेच नाहीत. त्यामुळे वर्ग २ चेदोन अधिकारी आळीपाळीने या रुग्णालयाचा कारभार पहात आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाची वेळ सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ६ असली तरी आज या रुग्णालयात दहा वाजता डॉक्टर हजर झाले. प्रथम दर्जाचे वैद्यकीय अधिकारी त्यांचे कक्षात असताना वर्ग दोनचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचेसमोर आलेल्यांना वयाचे दाखले देण्यासाठी क्लासवनच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे रबरी शिक्के मारून चक्क पैसे घेत होते़ पैसे घेतले जात असल्याचे समजताच आर.पी.आय. संघटनेचे अध्यक्ष सुशील धायजे यांनी या घेतलेल्या पैशाबाबत आरडाओरड करून वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी सहाय्यक अधिकाऱ्यांना पैसे परत देण्यास भाग पाडले. रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडूनही पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत़ ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मागणी करूनही ड्रेनेज दुरुस्ती होत नाही त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने या ठिकाणी राहणे अशक्य झाले आहे. ३० खाटांचे हे रुग्णालय असून, १० ते १५ रुग्ण येथे नेहमीच औषधोपचारासाठी दाखल असतात. या रुग्णालयात सर्पदंश लस, इतर साथीच्या आजारावरील औषधे, श्वानदंश लस उपलब्ध आहे. रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकारी पदे, एक्सरे टेक्निशियन पद एक, प्रयोग शाळा सहाय्यक पद एक, फार्मसिस्ट पद एक़ अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात अपेक्षित सेवा मिळत नाही़
रूग्णांची नव्हे
व्हीआयपीची प्रतीक्षा
श्रीरामपूर : वेळ सकाळी दहाची असो नाही तर सायंकाळी पाच वाजेची. श्रीरामपूरच्या ग्रामीण रूग्णालयास सध्या कुलपेच कुलपे दिसतात. कारण या रूग्णालयास रूग्णांची प्रतीक्षा आहे त्यापेक्षा अधिक प्रतीक्षा आहे ती उद्घाटनासाठी बड्या व्ही.आय.पी.ची. सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे रूग्णालय नगरपालिकेच्या दवाखान्यातच चालविले जात आहे. पण श्रीरामपूर नगरपालिका हद्दीबाहेर हरेगाव रस्त्यावर शिरसगाव हद्दीत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत श्रीरामपूरच्या एकमेव ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. या रूग्णालयावर थेट जिल्हा शल्य चिकित्सकांचे नियंत्रण आहे. डिसेंबर २०१४ मध्ये या रूग्णालयाचे बांधकाम खात्याने संबंधितांकडे हस्तांतरही केले आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत नवीन दोन दवाखाने मंजूर झाल्याने पालिकेस सध्याच्या दवाखान्याची जागा त्यासाठी लागणार आहे. त्यासाठी पालिकेने ग्रामीण रूग्णालयास पालिकेची जागा रिकामी करून देण्याबाबत दोनदा पत्र दिली आहेत. नव्या इमारतीचे बांधकाम होऊन काही वर्षे झाली असली तरी त्याचे उद्घाटन झालेले नाही. स्थानिक राजकारण्यांनी श्रेयाच्या स्पर्धेतून या रूग्णालयाची दोन-चारदा उद्घाटने केली आहेत. पण आरोग्य विभागास मात्र जाहीर कार्यक्रम करण्यासाठी व्ही.आय.पी. ची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अतिशय देखणे ग्रामीण रूग्णालय उद्घाटनाविना वापराशिवाय धूळ खात पडून आहे.
ग्रामीण रूग्णसेवा मरणासन्न
संगमनेर : घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात शासकीय कामाच्या वेळेत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने रूग्णांना रूग्णसेवा मिळणे दुरापस्त झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनद्वारे उघडकीस आले. ग्रामीण रूग्णालयाची वेळ सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ६ अशी आहे. या वेळेत रूग्णालयात नियुक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्युटीनुसार कामावर हजर राहणे बंधनकारक आहे. गुरूवारी दुपारी ४ ते ५ या दरम्यान घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये मात्र धक्कादायक सत्य उघड झाले. रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूचिता गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर, डॉ. कृष्णा वानखेडे यांची नियुक्ती आहे. सकाळी नित्यनियमाप्रमाणे ९ वाजता रूग्णालय सुरळीत चालू होते. तासभर आलेल्या रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचारही देण्यात आले. मात्र दुपारी ५ वाजेपर्यंत एकही वैद्यकीय अधिकारी रूग्णालयाकडे फिरकला नाही. डॉ. गवळी या प्रकृती बरोबर नसल्याने आल्याच नसल्याचे सांगण्यात आले. डॉ. भवर यांचा अपघात झाल्याने ते रजेवर होते. तर डॉ. वानखेडे काही कामानिमित्त बाहेर गेल्याने उशिरा रूग्णालयात आले. रूग्णालयाचा कारभार अधीक्षक, औषधनिर्माता, दोन परिचारीका, शिपाई, प्रयोगशाळा परिचर यांच्या भरवशावर सुरू होता. रूग्ण नोंदणी कक्षाला चक्क कुलूप होते. तेथील तीन रूग्ण डॉक्टरांची वाट बघून कंटाळले होते. चौकशी केली असता आम्ही तासभरापासून थांबलो असून डॉक्टर नसल्याने वैतागून गेल्याचे त्यांनी सांगितले. रूग्णालयात फेरफटका मारला असता सर्व विभाग सुंदरपणे सजविलेला दिसत होता. मात्र रूग्णांसाठी पिण्याच्या पाण्याच्या जल शुध्दीकरण यंत्र बंद होते. बालरोग कक्षात ‘सिक्युरिटी गार्ड’ झोपलेला होता. डॉ. गवळी व डॉ. भवर यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. आलेल्या रूग्णांनी तासभर डॉक्टरांची वाट बघून खासगी हॉस्पिटल गाठले. एक तासाने डॉ. गवळी खासगी वाहनात बसून आल्या. औषध निर्माता, परिचारीका व शिपायाने वाहनातच कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. खाली न उतरता बाहेरूनच त्या निघून गेल्या. अधिक माहिती घेतली असता प्रकृती बरी नसल्याने त्या शासकीय निवासस्थानी थांबल्याचे सांगण्यात आले. हजेरी रजिस्टरची चौकशी केल्यावर कर्मचाऱ्यांनी ते परस्पर लांबविले. ग्रामीण रूग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराबद्दल रूग्णांच्या कडवट प्रतिक्रिया उमटल्या.
माझी प्रकृ ती बरोबर नाही. मी आज रजेवर होते. सकाळीच रजेचा अर्ज दिलेला आहे. तपासणीसाठी बाहेर लॅबमध्ये गेले होते. डॉ. कृष्णा वानखेडे ड्युटीवर असतील. ओपीडीचे साबीर शेख उपस्थित आहेत.
- डॉ. सुचिता गवळी, वैद्यकीय अधीक्षक
आरोग्य उपकेंद्रच ‘कोमात’
श्रीगोंदा : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे़ अनेक केंद्रांमध्ये शवविच्छेदन व शस्त्रक्रिया विभाग बंद असल्याने रुग्णांची ससेहोलपट सुरु आहे़ तालुक्यात श्रीगोंदा येथे एक ग्रामीण रुग्णालय व काष्टी, लोणीव्यंकनाथ, पिंपळगाव, कोळगाव, आढळगाव, मांडवगण, बेलवंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ लोणी व्यंकनाथ, आढळगाव, काष्टी, कोळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना सुविधा पुरविण्याकडे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे़ बेलवंडी व मांडवगण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्राच्या निवासस्थानात न राहता नगरला राहतात़ त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची मुजोरी चांगलीच वाढली आहे़ केंद्रात सर्प व श्वान दंशाची लस उपलब्ध नसते़ इतर औषधांचाही तुटवडा असतो़ शवविच्छेदन केंद्र व शस्त्रक्रिया विभाग बंद पडले असून, या परिसरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे़ त्यामुळे उपकेंद्रांमध्ये रुग्ण फिरकतही नाही़

Web Title: Three Thirteen Rural Health ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.