तीन हजार शिक्षकांना मिळणार का बदलीची संधी?

By चंद्रकांत शेळके | Published: June 13, 2024 04:37 PM2024-06-13T16:37:24+5:302024-06-13T16:37:31+5:30

पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने ६ मार्च २०२४ रोजी काढले होते.

Three thousand teachers will get a chance to transfer? | तीन हजार शिक्षकांना मिळणार का बदलीची संधी?

तीन हजार शिक्षकांना मिळणार का बदलीची संधी?

अहमदनगर : पवित्र पोर्टलवरून शिक्षकांना नियुक्त्या देताना बदलीपात्र शिक्षकांना बदलीची संधी द्यावी, असे आदेश ग्रामविकास विभागासह शिक्षण विभागानेही दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना विनंती बदलीची संधी देऊन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जुलैमध्ये या बदल्या होणार का, सीईओ याबाबत निर्णय घेणार का? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने ६ मार्च २०२४ रोजी काढले होते. शिक्षण विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी सर्व जिल्हा परिषदांनी करावी, असे आदेश त्यानंतर ग्रामविकास विभागाने ११ मार्च २०२४ रोजी काढले. त्यानुसार अनेक जिल्ह्यात पवित्र पोर्टलनुसार भरती करण्याअगोदर शिक्षकांना बदलीची संधी देण्यात आली. काही जिल्ह्यात तर झालेली भरती प्रक्रिया रद्द करून बदलीला प्राधान्य देण्यात आले.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा परिषदेने ग्रामविकासचे आदेश आल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ मार्च रोजी १४१ शिक्षकांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पदस्थापना दिली. त्यावेळी शिक्षक संघटनांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला. मात्र, ग्रामविकासचा आदेश आपणास उशिरा मिळाल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे होते. दरम्यान, १६ मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागली. त्यामुळे बदल्यांचा विषय आपोआप मागे पडला. नंतर ग्रामविकासच्या आदेशाने शिक्षण विभागाने बदल्यांच्या प्रक्रियेची तयारी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार तालुकास्तरावर बदलीपात्र शिक्षकांचे अर्ज जमा करून घेण्यात आले. यात ३ हजारांहून अधिक अर्ज बदलीसाठी आल्याची माहिती आहे.

आता लोकसभेची आचारसंहिता संपली आहे. मात्र, विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता सुरू झाली आहे. १ जुलैपर्यंत ही आचारसंहिता आहे. त्यामुळेच त्यानंतर का होईना जिल्हा परिषदेने बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

दरम्यान, ग्रामविकास विभागाने १७ मे २०२४ रोजी सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा स्मरणपत्र देऊन ११ मार्चच्या पत्राची कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी बदल्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेच्या बदल्यांसंदर्भात वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते रावसाहेब रोहोकले यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केलेली आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

...तर जुलैमध्येही होऊ शकतात बदल्या
या बदली प्रक्रियेबाबत काय कार्यवाही करायची, याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, अद्याप त्यावर मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे बदलीचा पेच निर्माण झाला आहे. हे मार्गदर्शन आल्यास जुलैमध्येही बदल्यांची प्रक्रिया होऊ शकते.

Web Title: Three thousand teachers will get a chance to transfer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.