संगमनेर तालुक्यात तिस-यांदा फोडले एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:28 PM2018-04-12T16:28:19+5:302018-04-12T16:33:59+5:30
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून चोरटे पसार झाले. या घटनेत चोरट्यांनी किती रक्कम लांबविली याची माहिती मिळू शकली नाही.
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून चोरटे पसार झाले. या घटनेत चोरट्यांनी किती रक्कम लांबविली याची माहिती मिळू शकली नाही.
वडगाव पान येथे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मालकीच्या गाळ्यात इंडिया एटीएम कंपनीचे एटीएम मशिन आहे. गुरूवारी पहाटेच्या दरम्यान काही चोरट्यांनी एटीएम केंद्रात जाऊन तेथील मशिन बाहेर आणले. बाहेर घेऊन आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या वाहनात हे एटीएम मशिन टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते फार जड असल्याने त्यांनी ते केंद्राच्या परिसरातच टाकून पोबारा केला. या एटीएम मशिनमधून नक्की किती रक्कम गायब झाली? हे मात्र समजू शकले नाही.
जिल्हा बँकेच्या सुरक्षारक्षकाला गस्त घालताना एटीएम केंद्र फोडल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ ही बाब संगमनेर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यास कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व सहायक निरीक्षक शिवाजी पाळंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार औटी अधिक तपास करीत आहेत.
जिल्हा बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये गुन्हेगार कैद झालेले आहेत. हे फुटेज पोलिसांच्या हाती आल्यानंतरच आरोपींचे धागेदोरे हाती लागण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.