धक्कादायक ! तीन वर्षांची चिमुकली दोन दिवस बसून राहिली प्रेतांजवळ; अकोले येथे पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:27 AM2017-12-09T11:27:37+5:302017-12-09T11:29:44+5:30
शहरातील शिवाजीनगर भागात पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली. या माता-पित्यांच्या प्रेताजवळ त्यांची तीन वर्षीय चिमुकली चक्क दोन दिवस बसून होती.
अकोले : शहरातील शिवाजीनगर भागात पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली. या माता-पित्यांच्या प्रेताजवळ त्यांची तीन वर्षीय चिमुकली चक्क दोन दिवस बसून होती. चिमुकलीच्या रडण्यामुळे तिस-या (गुरुवारी) दिवशी रात्री ही घटना उघडकीस आली.
प्रकाश निवृत्ती बंदावने (वय ३३) व चित्रा प्रकाश बंदावणे (वय २०) असे मयत दाम्पत्याची नावे आहेत. ते अकोले तालुक्यातील रेडे येथील रहिवासी आहेत. सध्या शिवाजीनगर येथे राहत होते़ प्रकाश याचे यापूर्वीच लग्न झाले होते. त्याला तीन मुले आहेत. तर चित्रा घटस्फोटित होती. तिला पहिल्या पतीची तीन महिन्यांची मुलगी आहे. ही मुलगी चित्रा हिच्यासोबत होती. प्रकाश व चित्रा यांचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्या दोघांनी लग्न केले होते, असे चित्राच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान दोघांमध्ये सध्या भांडणे होत होती. गुरुवारी रात्री चित्राचे वडील बाबू रजपूत (रा. वडगावपान) यांनी फोन केला, तेव्हा घरात लहान मुलगी रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. लागलीच पोलिसांनी शेजा-यांच्या मदतीने घराचा बाहेरून कुलूप लावलेला दरवाजा तोडला. तेव्हा आत तीन वर्षांची चिमुकली तनिष्का रडत होती. चित्रा झोपलेल्या अवस्थेत तर प्रकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात पुढे आले. मयत महिलेचे वडील बाबू रजपूत यांच्या फिर्यादीवरुन मयत प्रकाश याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर घटनेचा तपास करीत आहेत.
भूक लागल्यावर तिने खालला सुकामेवा
तीन वर्षांची चिमुकली तनिष्का ही घरात दोन दिवस दोन्ही प्रेताजवळ एकटीच होती. भूक लागल्यावर तिने फ्रिज उघडून दूध व बरण्यांमधून सुकामेवा खाल्ल्याचे दिसून आले. घराचे दोन्ही दरवाजे बंद असल्यामुळे तिच्या रडण्याचा आवाज दोन दिवस बाहेर पोचला नाही. आजोबाने फोन केला आणि तिने तो उचलल्यानंतर तिच्या रडण्याच्या आवाजाने आजोबांनी पोलिसांच्या मदतीने घराकडे धाव घेतली. त्यानंतर या दुर्दैवी घटनेचा छडा लागला.