निळवंडे शिवारात आढळली बिबट्याची तीन पिल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:10 AM2019-04-08T11:10:50+5:302019-04-08T11:10:59+5:30

संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील निवृत्ती नामदेव पवार यांच्या शेतातील गिन्नी गवतात शनिवारी सकाळी बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली.

Three young puppies found in Nilvande Shivar | निळवंडे शिवारात आढळली बिबट्याची तीन पिल्ले

निळवंडे शिवारात आढळली बिबट्याची तीन पिल्ले

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील निवृत्ती नामदेव पवार यांच्या शेतातील गिन्नी गवतात शनिवारी सकाळी बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने निळवंडे परिसरात नागरिकात घबराटीचे वातावरण आहे.
निळवंडे शिवारात मोठ्या प्रमाणात डाळिंब बागा आहेत. या भागात पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्यांचा संचार सुरु झाला आहे. निवृत्ती नामदेव पवार यांच्या शेतात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा जालिंदर निवृत्ती पवार गिन्नी गवत कापण्यासाठी गेला होता. गिन्नी गवत कापत असताना त्यास गवतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे यांनी त्वरित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
संगमनेर विभागाचे उपविभागीय वनअधिकारी मच्छिंद्र गायकर, संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल बी.एल.गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शिवाजी डांगे, वनरक्षक संतोष पारधी, वनकामगार संपत ढेरंगे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सदर ठिकाणी त्यांनाही बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. मात्र आई व पिल्लांची ताटातूट केल्यास मादी बिबट्या हिंसक बनायला नको, या उद्देशाने त्यांनी पिल्ले त्याठिकाणीच ठेवली आहेत.
रविवारी सकाळी पुन्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता पिल्ले आढळून आली नाहीत. मादी बिबट्याने रात्रीच पिल्ले दुसरीकडे हलविली होती. निळवंडे परिसरात मादी बिबट्याने काही हिंसक उपद्रव केल्यास त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल, असे वनपाल शिवाजी डांगे यांनी सांगितले.

Web Title: Three young puppies found in Nilvande Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.