पारनेरमध्ये शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर; रोहोकलेंनी मागितला लंकेंचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:47 PM2018-01-05T14:47:50+5:302018-01-05T14:48:28+5:30
सुजित झावरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तसेच त्यांना पुरक राजकीय भूमिका घेणारे शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सेनेचे उपतालुकाप्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहकले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.
पारनेर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तसेच त्यांना पुरक राजकीय भूमिका घेणारे शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सेनेचे उपतालुकाप्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहकले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. लंके यांनी काही दिवसांपूर्वी सुजित झावरेंच्या गाडीचे सारथ्य केले होते़ त्यावरुन आता पारनेरमध्येशिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे.
पत्रकारांशी बोलताना रोहकले म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद असून त्यामुळे सामान्य शिवसैनिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षात पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत लंके यांनी सेनेच्या विरोधी उमेदवारांना रसद पुरविली. जि. प. च्या ढवळपूरी गटातून पाच वर्षापूर्वी आपण व गेल्या वर्षी आपल्या आईने अनुक्रमे सुजित झावरे व त्यांच्या आई सुप्रिया झावरे यांच्याविरोधात निवडणूक लढविली. तेथे आम्ही झावरे यांच्याविरोधात संघर्ष केलेला असताना पक्षाचे तालुकाप्रमुख मात्र त्यांना पुरक भुमिका घेतात, ही बाब पक्षासाठी हानीकारक आहे. याच गटात अलिकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लंके यांनी राष्ट्रवादीच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचे तसेच इतर उमेदवारांचे जाहिर समर्थन केले, ही बाबही सामान्य शिवसैनिकांना रूचलेली नाही. ढवळपूरी तसेच टाकळी ढोकेश्वर या दोन्ही गटांमध्ये पूर्वी झावरे यांचे प्राबल्य होते. गेल्या 12, 13 वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसैनिकांनी संघर्ष करून दोन्ही गटावर सेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या संघर्षात अनेक शिवसैनिकांची डोकी फुटलेली असताना लंके झावरेंचे समर्थन त्यांच्या जखमेवर करून मिठ चोळू पाहत आहेत, का असा सवालही रोहकले यांनी केला.
तांबेंच्या पराभवास लंके जबाबदार
भाळवणी पंचायत समिती गणातून पक्षाने बाबासाहेब तांबे यांच्या पत्नी सुमन तांबे यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली होती. तेथेही लंके यांनी खोडा घालून तांबे यांच्या पराभवास हातभार लावला. गोरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाने बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ उभे केलेले असताना लंके मात्र राष्ट्रवादीच्या कळपात होते. ज्या सुपा गटातून लंके यांच्या पत्नी राणीताई यांनी निवडणूक लढविली त्या गटातही सुजित झावरे समर्थकांशी शिवसैनिकांनी संघर्ष केलेला आहे. मात्र, लंके यांनी आता राजकीय भूमिका बदलून झावरेंशी जवळीक साधली आहे, असे रोहोकले म्हणाले.