थोरातांच्या मध्यस्थीने मुरकुटे ससाणेंचे ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:19 AM2021-03-15T04:19:00+5:302021-03-15T04:19:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यात राजकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यात राजकीय समेट घडवून आणला आहे. मुरकुटे हे अशोक साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवितात. तेथे ससाणे यांनी माघार घ्यावी व मुरकुटे यांनी ससाणेंना नगरपालिकेत साथ द्यावी, असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे मुरकुटे यांच्यासमोरच थोरातांनी हे जाहीर केल्याने श्रीरामपूरच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येनंतर मंत्री थोरात यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा कुटुंबीयांची भेट घेतली. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर उपस्थित होते.
थोरात यांनीच जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मुरकुटे व ससाणे यांच्यातील राजकीय वैर संपुष्टात आणत दोघांचीही बिनविरोध निवड केली होती. तेव्हापासून मुरकुटे व ससाणे हे तालुक्यात कार्यकर्त्यांचे एकत्रित सत्कार स्वीकारत आहेत.
तालुक्याच्या राजकारणात मुरकुटे व ससाणे हे दोन प्रबळ राजकीय गट आहेत. दिवंगत नेते जयंत ससाणे व भानुदास मुरकुटे यांच्यात १५ वर्षांहून अधिक काळ टोकाचा राजकीय संघर्ष झाला. आता मात्र ससाणे यांचे पुत्र करण हे मुरकुटे यांच्या समवेत अनेक जाहीर कार्यक्रमात एकत्र हजेरी लावत आहेत. यात दोन्ही गटातील प्रमुख कार्यकर्तेही मागे नाहीत. जिल्हा बँकेत बिनविरोध निवड झाल्यानंतर ससाणे हे सचिन गुजर यांच्या समवेत अशोक बँकेच्या कार्यालयात गेले होते. तेथे मुरकुटे व ससाणे दोघांनीही एकमेकांना पेढे भरवले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हाच दोघांतील नवी राजकीय मैत्री जगजाहीर झाली होती.
मात्र, शनिवारी महसूलमंत्री थोरात यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. मुरकुटे हे अशोक कारखान्यात चांगले काम करत आहेत. त्यामुळे ससाणे यांनी तेथे निवडणूक लढवू नये, तर ससाणे हे पालिकेत चांगले काम करू शकतील. तेथे मुरकुटे यांनी त्यांना साथ करावी, अशी सूचना थोरात यांनी मुरकुटे व ससाणे समर्थक सचिन गुजर यांच्यासमोर केली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अशोक साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे स्थगिती उठताच लवकरच निवडणूक लागेल. ससाणे हे तेथे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.
याच वर्षात श्रीरामपूर पालिकेची निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत दिवंगत नेते जयंत ससाणे यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी मुरकुटे यांनी राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक, तसेच भाजप व शिवसेनेची मोट बांधली होती. यावेळी मात्र मुरकुटे व ससाणे युती होण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या राजकारणाला ही कलाटणी मानली जात आहे.
-------
विखे गटाची अडचण
तालुक्याच्या राजकारणात मुरकुटे व भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे गट गेल्या काही काळापासून एकत्र आले होते. थोरात यांच्या गुगलीमुळे विखे गटाची मात्र अडचण होणार आहे. विखे गटाला त्यामुळे स्वतंत्ररित्या वाटचाल करावी लागणार आहे.