आचारसंहितेला पितृपक्ष आडवा
By Admin | Published: September 11, 2014 11:10 PM2014-09-11T23:10:12+5:302023-11-06T13:04:26+5:30
अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते.
अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर पितृपक्षातच अर्ज दाखल करावे लागतील, अशी धास्तीच इच्छुकांनी घेतली आहे. घटस्थापना झाल्यानंतरच्या काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. लागणार, लागणार ती आचारसंहिता अद्यापही लागली नसल्याने राजकीय नेते-कार्यकर्त्यांची ‘काक’दृष्टी आता निवडणूक कार्यक्रमाकडे लागली आहे.
श्री. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वांनाच हुलकावणी दिली. होणार होणार म्हणून होणारी आयोगाची पत्रकार परिषद झालीच नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला. ९ सप्टेंबरला आचारसंहिता लागली असती तर कदाचित अर्ज विकत घेण्याची प्रक्रिया पितृपक्षातच सुरू झाली असती, अशी धास्ती अनेकांना होती. भारतीय संस्कृतीमधील पितृपक्षाला असलेले महत्त्व आणि या काळात टाळली जाणारी शुभ कामे यामुळे आचारसंहिता जाहीर करण्याचा मुहूर्तही पुढे ढकलला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज-उद्या आचारसंहिता जाहीर झाली तरी निवडणूक प्रक्रिया ही घटस्थापनेनंतर सुरू होईल, अशीच दुसरी शक्यताही व्यक्त होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, असे सांगितल्याने कोणते ती दोन राज्ये अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सध्याची पूरपरिस्थिती पाहता तेथे निवडणूक होण्याची शक्यता नसल्याने महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत एक-दोन दिवसात आचारसंहिता लागेल, या आशेवरच सर्वजण आहेत. आपल्या पितरांची आठवण व्हावी, अशी भावना पितृपक्षामध्ये असते. याबाबत अनेक मतभेद आहेत. पितरांच्या नावाने पिंडदान, श्राद्ध घातले जात असल्याने शुभकार्य टाळण्याकडेच अनेकांचा कल आहे.
(प्रतिनिधी)