मोफत धान्यासाठी ‘ई-पॉस’वर अंगठा; वाढणार कोरोनाचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:17+5:302021-05-05T04:34:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : राज्यात ३ एप्रिलपासून कडक निर्बंध लावत लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर हाताला काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : राज्यात ३ एप्रिलपासून कडक निर्बंध लावत लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर हाताला काम नसल्याने रेशनकार्ड धारक कुटुंबांना मदत म्हणून शासनाकडून मे महिन्यात रेशनवर मिळणाऱ्या धान्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. मात्र, हे धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानात कार्ड धारकाला ‘ई-पॉस’ मशीनवर अंगठा द्यावा लागणार आहे. त्यामुळे यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून आलेल्या वैश्विक कोरोना महामारीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यावर अनेक उपाययोजना करूनही नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शासनाने ३ एप्रिलपासून लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे बाजारपेठ थांबल्याने रोजगारही थांबला. त्यामुळे नागरिकांना आधार म्हणून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यात एकूण १४ तालुके आहेत. या सर्व तालुक्यांत शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानामार्फत रेशनकार्ड धारकांना गहू, तांदूळ, साखर, मका आदी धान्यांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार मे महिन्यात अंत्योदय कार्डधारकांना प्रतीकार्ड २५ किलो गहू, १० किलो तांदूळ तर २० रुपयांत एक किलो साखर देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील रेशनकार्ड धारकांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना - ३ नुसार प्रती व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ व १ किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. हे सर्व धान्य घेण्यासाठी लाभार्थी हे दुकानात येणार आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यातून गावागावात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
---------------
एकूण रेशनकार्ड धारक - १०,८८,३८५
प्राधान्य कुटुंब लाभार्थी - ६,०५,५२४
अंत्योदय - ८८,६१८
केशरी - ३,३५,६६०
शुभ्र - ५८,५८३
----------
रेशन दुकानात सॅनिटायझर ठेवण्यात येणार
शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक दुकानात ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. मात्र, दुकानदारांच्या व ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुकानदारांना यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
--------
ग्राहकांनी सहकार्य करावे.
गेली अनेक वर्षे शासानाकडे आमच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच शासनाने ग्राहकांना मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे धान्य घेण्यासाठी येताना ग्राहकांनी मास्कचा वापर करावा. गर्दी करू नये. दुकान महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुरक्षित रहावे आणि आम्हांलाही सुरक्षित ठेवावे एवढीच अपेक्षा आहे.
- रोहित जोशी, सेल्समन, साईरेणुका महिला बचत गट दुकान क्र. ३, कोपरगाव
------------
मे महिन्याचे मोफत वाटपासाठीचे धान्य तालुका पातळीवर पोहोच करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, धान्य वितरीत करण्याची ऑनलाईन प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच धान्य वितरीत होईल. मात्र, जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचे शिल्लक असलेले धान्य मोफत धान्य म्हणून वाटप करण्यास सुरुवात करावी, असे आदेश देण्यात आले आहे.
- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर
............