अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
By अरुण वाघमोडे | Published: April 12, 2023 04:54 PM2023-04-12T16:54:59+5:302023-04-12T16:55:19+5:30
जिल्ह्यात १४ एप्रिल २०२३ पर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
अहमदनगर: भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्यात १४ एप्रिल २०२३ पर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या काळात नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल,सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा वीजरोहित्राजवळ थांबू नये. अधांतरी लटकणाऱ्या केबल्सपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.