नगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:42+5:302021-03-22T04:19:42+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील नेवासा, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, संगमनेर, कोपरगाव आणि अहमदनगर तालुक्यांत शनिवारी आणि रविवारी वादळीवाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे ...
अहमदनगर : जिल्ह्यातील नेवासा, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, संगमनेर, कोपरगाव आणि अहमदनगर तालुक्यांत शनिवारी आणि रविवारी वादळीवाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, ज्वारी, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरू झाली आहे.
अनेक ठिकाणी वादळीवाऱ्याने झाडे व विजेचे खांब कोलमडून पडले. तर, काही ठिकाणी घरांचीदेखील पडझड झाली आहे. गव्हाची काढणी सुरू असतानाच पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यासह कांद्यालाही अवकाळीचा मोठा फटका बसला. फळझाडेही उन्मळून पडली आहेत. कैऱ्यांनी लगडलेल्या आंब्याच्या झाडांना गारपिटीचा तडाखा बसला. झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला. सध्या अनेक भागांत गहू कापणीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी गहू शेतातच उभा आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे गहू भुईसपाट झाला. कापणी झालेल्या गव्हाच्या पेंढ्यांवर गारांचा सडा पडला. गहू भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी ज्वारीच्या कडब्याच्या गंजी रचून ठेवल्या आहेत. हा कडबा पूर्णपणे भिजला आहे. त्याचबरोबर संत्रा बागांबरोबरच डाळिंबाच्या बागेलाही हानी पोहोचली आहे. डाळिंबाला आलेला बहर गारपीट झाल्याने गळाला आहे.
गारपिटीमुळे शेतातील कांदा पिकांचे नुकसान झाले. वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे कोसळली. नुकसान झालेल्या पिकांसह फळबागांचेही पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाथर्डी, शेवगाव, नगर तालुका व नगर शहरात रविवारी सायंकाळी गारांचा सडा पडला. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली.