वाटाणा उत्पादनातून तिखोल गाव बनले समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:11+5:302021-04-10T04:20:11+5:30
पारनेर : एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वच क्षेत्र आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा स्थितीतही पारनेर तालुक्यातील तिखोल येथील ...
पारनेर : एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वच क्षेत्र आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा स्थितीतही पारनेर तालुक्यातील तिखोल येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी वाटाण्याचे उत्पादन घेऊन लॉकडाऊनवर मात केली आहे. दररोज दहा ते बारा टन वाटाणा पुण्या-मुंबईत विक्री होऊन आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असल्याने गाव समृद्ध झाले आहे. शिवाय परिसरातील दोनशे शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
उन्हाळी वाटाण्यासाठी तिखोल गाव राज्यभर प्रसिद्ध आहे. येथे तलावात उन्हाळ्यातही पाणी असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी पीक घेणे फायदेशीर ठरते. वाटाण्याची जानेवारीत पेरणी केल्यास फेब्रुवारी, मार्च दरम्यान तोडणी सुरू होते. कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक वर्षांपासून तिखोल गाव वाटाणा उत्पादन घेत आहे. तिखोल गाव वाटाणा उत्पादन घेत असल्याने वाटाणा तोडणीसाठी भाळवणी, ढवळपुरी, धोत्रे, करंदीसह जवळील गावातील महिला व शेतमजुरांना रोजगार मिळत आहे. दोनशे मजुरांना दररोज रोजगार मिळत असून, त्यांना तीनशे रूपये रोजंदारी मिळते.
--
दररोज मिळतात दहा ते बारा लाख...
पुण्या-मुंबईत
सध्या वाटाणा पिकाचे विक्रमी उत्पन्न निघत असून, दररोज गावातून सरासरी १० टन वाटाणा मुंबई व पुणे बाजारपेठेत रवाना होत आहे. सरासरी ५० ते ६० रूपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असल्याने दररोज गावात १० ते १२ लाख रूपये येत आहेत, असे
तालुका कृषी समितीचे प्रगतशील शेतकरी भानुदास ठाणगे, संदीप ठाणगे, संकेत ठाणगे व अजित ठाणगे यांनी सांगितले.
--
तरुण पिढीही वाटाणा उत्पादनात..
गावातील सध्याची तरुण पिढीही वाटाणा उत्पादनच घेत आहे. ते स्वतः शेतात जाऊन काम करीत आहेत. यामुळे गावातील तरूण शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. दोनशे ते तीनशे एकरावर वाटाणा उत्पादन घेतले जाते, असे पारनेर महाविद्यालयात टीवायचे शिक्षण घेणारा संकेत ठाणगे हा तरुण अभिमानाने सांगत होता.
--
०९ पारनेर वाटाणा
पारनेर तालुक्यातील तिखोल येथे वाटाणा निवडताना शेतकरी, महिला मजूर.