शताद्बी वर्षातही टिळकांचे स्मृतिस्थळ दुर्लक्षित
By साहेबराव नरसाळे | Published: May 9, 2019 12:02 PM2019-05-09T12:02:49+5:302019-05-09T12:03:14+5:30
पश्चिम हिंदुस्तानचे टागोर, महाराष्ट्राचे वर्डस्वर्थ, महाराष्ट्राचे शेवटचे संतकवि आणि फुला-मुलांचे कवी अशी ख्याती असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे नगरमधील स्मृतिस्थळ एक शतकाचा काळ उलटला तरी दुर्लक्षितच राहिले आहे़
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : पश्चिम हिंदुस्तानचे टागोर, महाराष्ट्राचे वर्डस्वर्थ, महाराष्ट्राचे शेवटचे संतकवि आणि फुला-मुलांचे कवी अशी ख्याती असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे नगरमधील स्मृतिस्थळ एक शतकाचा काळ उलटला तरी दुर्लक्षितच राहिले आहे़ महाराष्ट्रात एकमेव असलेल्या या स्मृतिस्थळाचा विकास व्हावा, अशी मागणी अभ्यासकांमधून होत आहे़
रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे ६ डिसेंबर १८६१ रोजी चित्पावन ब्राम्हण कुटुंबात नारायण टिळक यांचा जन्म झाला़ पुढे त्यांनी तुकाराम नत्थुजी धेंडे यांच्या हातून १० फेब्रुवारी १८९५ रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारला़ टिळक १८८६ साली नगरला आले आणि पुढे २५ वर्षे नगरमध्येच वास्तव्यास होते़ नगरमध्ये जुन्या वसंत टॉकीजजवळ फर्ग्युसन गेट या ठिकाणी राहत होते़ याच काळात नगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती धर्माच्या विख्यात मासिकाचे ते ७ वर्षे संपादक होते. ३१ आॅगस्ट १९०४ रोजी राहुरीत ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून दीक्षाही घेतली आणि रेव्हरंड ही उपाधी त्यांना मिळाली़ राहुरी येथे त्यांनी गरीब व गरजू लोकांसाठी ‘ख्रिस्त सदन’ची उभारणी केली़ रेव्हरंड टिळक यांच्यासोबत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हेही नगरमध्ये वास्तव्यास होते़ रेव्हरंड टिळक व लक्ष्मीबाई यांनी बालकवींचा सांभाळ केल्याचे सांगितले जाते़ ख्रिस्ती धर्मातील ‘उपासना संगीत’ या पुस्तकातील अनेक गीते टिळकांनी नगरमध्येच लिहिली़ मराठी ख्रिस्ती साहित्यात त्यांनी ‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य लिहिले़ यातील काही भाग त्यांनी नगरमध्ये व काही साताºयामध्ये लिहिला आहे़ ९ मे १९१९ साली टिळकांचे मुंबई येथे निधन झाले़ त्यांच्या मृत्युपत्रात नगरमध्ये अस्थींचे दफन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती़ त्यानुसार नगरमध्ये अस्थींचे दफन करण्यात आले व तेथे त्यांचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले़ या स्मृतिस्थळाभोवती पूर्वी लोखंडी कंपाउंड होते़ मात्र, त्याचे लोखंड काही लोकांनी चोरुन नेले होते़ त्यामुळे स्मृती शताब्दी वर्षानिमित्त फेबु्रवारी २०१९ मध्ये या स्मृतीस्थळाची रंगरंगोटी करण्यात आली़ टिळकांच्या साहित्याचे अभ्यासक वर्षभर त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात़ टिळकांच्या साहित्यावर अनेकांनी डॉक्टरेट मिळविलेली आहे़ लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रा’त नगरचा उल्लेख आहे़ ते वाचल्यानंतर अनेक अभ्यासक नगरला येतात़ स्मृतिस्थळास भेट देतात़ त्यामुळे या स्मृतिस्थळाचा विकास होणे आवश्यक आहे, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे़
स्मृती शताद्बी वर्षानिमित्त टिळकांचे दुर्लक्षित असलेले स्मृतिस्थळ विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे़ त्यासंदर्भात लवकरच नियोजन करुन पुढील दिशा ठरविण्यात येईल़ -संजय आढाव, टिळकांच्या साहित्याचे अभ्यासक