जेऊर येथील बहुरूपी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:20 AM2021-05-23T04:20:00+5:302021-05-23T04:20:00+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील बहुरूपी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना पालातच ...
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील बहुरूपी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना पालातच बसून राहावे लागत आहे.
जेऊर येथे नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातून १३ कुटुंब उपजीविकेसाठी जेऊर येथे वास्तव्यास आले आहेत. महावितरण कंपनीच्या चौकात पाल टाकून हे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून वास्तव्य करत आहेत.
बहुरूपी हे गावोगावी तसेच आठवडे बाजारांमध्ये भटकंती करत असतात. नकला करून मिळणाऱ्या मोबदल्यात आपली व कुटुंबीयांची उपजीविका भागवत असत. परंतु ,कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन तसेच बंद करण्यात आलेले आठवडे बाजार यामुळे बहुरूपी यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जेऊर येथे असे १३ कुटुंब वास्तव्यास असून, त्यामध्ये ६० सदस्य आहेत. या धकाधकीच्या जीवनात लोकांचे विविध नकला करून मनोरंजन करणाऱ्या बहुरूपी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्त्यापुरुषांबरोबर चिमुकल्यांची जगण्यासाठी धडपड सुरू असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये याच कुटुंबीयांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य व किराण्याची मोठी मदत केली होती. परंतु, तीच परिस्थिती आज बहुरूपीयांच्या पालावर उद्भवली असून, सर्व कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
---
हाताला काम नाही घरात राशन नाही
नकला केल्यानंतर लोकांकडून अन्नधान्य तसेच काही पैसे मिळतात. त्यावर कुटुंबाची उपजीविका चालते. परंतु, लॉकडाऊनमुळे जीवनाची घडी बिघडली. शेतातील कामे संपल्याने हाताला काम मिळत नाही. घरात खायला राशन नाही. प्रशासनाकडून मदत मिळाली तर बरे होईल.
-सुनील शिंदे,
बहुरूपी कलाकार, जेऊर
---
ग्रामपंचायत करणार मदत
जेऊर येथील बहुरूपी कुटुंबीयांना ग्रामपंचायत कार्यालयाकडून किराणा व इतर मदत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सविता लांडे व सरपंच राजश्री मगर यांनी दिली.
----
जेऊर बहुरूपी
जेऊर परिसरातील बहुरूपी कुटुंबांचे पाल