पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ : जायकवाडीला जिल्ह्यातून जाणार ५.७५ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:50 PM2018-10-24T12:50:47+5:302018-10-24T12:51:07+5:30

नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिलेले आहेत.

Time to prepare for leaving the water: Jayakwadi will go 5.75 TMC water from the district | पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ : जायकवाडीला जिल्ह्यातून जाणार ५.७५ टीएमसी पाणी

पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ : जायकवाडीला जिल्ह्यातून जाणार ५.७५ टीएमसी पाणी

अहमदनगर : नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिलेले आहेत. परंतु पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार असल्याने त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील धरणांतून ५.७५ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी जाणार आहे.
नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश मंगळवारी
गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला बजावला. त्यानंतर जिल्ह्यातून राजकीय, प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या.
तातडीने पाणी सोडण्याचा आदेश असला तरी पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीला व पाणी सोडण्याच्या नियोजनाला तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार आहे. प्रवरा व मुळा नदीतून पाणी जाणार असून, यादरम्यान असलेल्या बंधाऱ्यांच्या फळ्या काढणे, पाणी सोडल्यानंतर अवैध उपसा होऊ नये म्हणून नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करणे, पाणीप्रश्नावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करणे, पाणीचोरी होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाचे पथक नेमणे आदी उपाययोजनांसाठी प्रशासन तयारी करत आहे.

जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व आढळा या तिन्ही धरणांतून ३.८५ टीएमसी पाणी प्रवरा नदीतून जायकवाडीसाठी जाणार आहे. निळवंडे ते जायकवाडी हे अंतर १७२ किलोमीटर असून त्यात १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. याशिवाय मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून मुळा ते जायकवाडी हे अंतर ६५ किलोमीटर आहे. यादरम्यान, ७ कोल्हापूर बंधारे आहेत. बंधाºयांच्या फळ्या काढण्यापासून सर्व तयारीसाठी पाटबंधारे विभाग नियोजन करत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी सोडण्याबाबत निर्णय होणार आहे.

पाणी सोडण्याचे आदेश आलेले आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाला तयारी करण्यासाठी वेळ लागेल. जिल्ह्यासाठी किती पाणी आरक्षित ठेवायचे, पाणी सोडण्यास कोणाचा विरोध आहे का? या सर्व बाबी विचारात घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

Web Title: Time to prepare for leaving the water: Jayakwadi will go 5.75 TMC water from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.