ठेकेदारांच्या मुजोरीमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:33+5:302021-04-13T04:20:33+5:30
अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीत कंत्राटी ठेकेदारांकडून कामगारांची पिळवणूक होत असून, त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार ...
अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीत कंत्राटी ठेकेदारांकडून कामगारांची पिळवणूक होत असून, त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लढा उभारणार असल्याचे जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी कळविले आहे.
लांडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, काही कंपनीतील ठेकेदारांच्या मुजोरपणामुळे कामगारांचे वेतन वेळेवर दिले जात नाही. तसेच कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून काढले जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात कामगारांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. एका कारखान्यातील ३० कंत्राटी कामगारांचे दीड महिन्याचे पगार थकवले गेले. कामगारांनी पगाराची मागणी केली असता, शिवीगाळ करीत मारहाण केली गेली. ही बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांच्या हक्कासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून लढा उभारून कोणत्याही कामगारावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. उद्योजक व कामगार एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दोघांच्या सहकार्यातून उद्योजक वाढतात. मूठभर लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे कामगार व उद्योजकांमध्ये संघर्ष निर्माण होऊन बदनामी होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन लांडे यांनी केले आहे.