भाडे थकविल्याने पोस्ट कार्यालयाला सील ठोकले : कर्मचारीही कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:33 AM2018-05-18T11:33:39+5:302018-05-18T11:34:59+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल २७ वर्षांचे भाडे थकविणाऱ्या राहुरी पोस्ट कार्यालयाला गुरूवारी सायंकाळी समितीने सील ठोकले.
राहुरी: कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल २७ वर्षांचे भाडे थकविणाऱ्या राहुरी पोस्ट कार्यालयाला गुरूवारी सायंकाळी समितीने सील ठोकले. सील ठोकल्यानंतर आत अडकलेल्या पोस्ट कर्मचा-यांची गुरूवारी सायंकाळी ७ वाजता सुटका करण्यात आली.
राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या इमारतीमध्ये गेल्या २७ वर्षांपासून पोस्ट कार्यालयाचा कारभार चालतो. बाजार समितीची पोस्ट खात्याकडे १३ लाख ७८ हजार रूपये थकबाकी आहे. यासंदर्भात बाजार समितीने पोस्टाला वारंवार नोटिसा दिल्या़ वरिष्ठ कार्यालयाकडून पूर्तता झाल्यानंतर भाडे देऊ, असे पोस्ट अधिका-यांकडून वारंवार सांगण्यात आले़ गेल्यावर्षीही पोस्ट कार्यालयाला सील ठोकण्यात आले होते.
गुरूवारी दिवसभर पोस्ट कार्यालयातील कर्मचा-यांनी कार्यालयातील सामान राहुरीच्या शिवाजी रस्त्यावरील कार्यालयात वाहून नेले. त्यानंतर ही बाब बाजार समितीच्या लक्षात आली़ समितीने पोस्ट कार्यालयाची पाहणी केली असता तेथे केवळ तिजोरी व जनरेटर आढळले. बाजार समितीचे पदाधिकारी व पोस्टाचे कर्मचारी यांच्यात चर्चा होऊन भाडे अदा करण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही. पोस्टमास्तर एस. के. दातीर यांनी तुम्ही खोल्या ताब्यात घ्या, असे सांगितले. त्यावर बाजार समितीच्या अधिका-यांचे समाधान झाले नाही. अधिकारी व कर्मचाºयांनी बाजार समितीच्या आवारातील पोस्ट कार्यालय गाठले. समितीचे सचिव प्रकाश डुक्रे,लेखापाल भिकादास जरे, अंतर्गत लेखापरीक्षक एम.आर.शेख व कर्मचा-यांनी पोस्ट कार्यालयाला सील ठोकले. त्यामुळे कार्यालयात चार पोस्ट कर्मचारी अडकू न पडले़ त्यांची सायंकाळी उशिराने सुटका करण्यात आली.