भावाच्या त्रासाला कंटाळून भावाची आत्महत्या
By शेखर पानसरे | Published: April 18, 2023 07:18 PM2023-04-18T19:18:50+5:302023-04-18T19:20:24+5:30
भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
संगमनेर (अहमदनगर) : भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि.१७) दुपारी २.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील रहिमपूर येथील ही घटना आहे. ज्ञानदेव देवराम जोर्वेकर (वय ५० वर्षे, रा. जुने रहिमपूर ता. संगमनेर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुकाराम देवराम जोर्वेकर (रा. रहिमपूर, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मयत ज्ञानदेव जोर्वेकर यांच्या पत्नी अनिता उर्फ अन्नपूर्णा ज्ञानदेव जोर्वेकर (रा. जोर्वेकर वीटभट्टी, जुने रहिमपूर ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटण्यात तुकाराम जोर्वेकर याने घरामध्ये हिस्सा, शेती अवजारे अशा कोणत्याच वस्तू दिल्या नाहीत. तसेच मयत ज्ञानदेव जोर्वेकर यांना व त्यांच्या मुलाला वर्षभरापूर्वी शेतात शिवीगाळ करत मारहाण केली होती. अनिता उर्फ अन्नपूर्णा जोर्वेकर याचे नावावर असलेल्या जमिनीवर कर्ज काढले, ती जमीन व शेततळ्याचे पाणी देत नसल्याने त्यांचे पती ज्ञानदेव जोर्वेकर हे नेहमी विचारात, चिंतेत असायचे. तुकाराम जोर्वेकर याने अनिता उर्फ अन्नपूर्णा ज्ञानदेव जोर्वेकर यांच्या शेतात घास टाकला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ज्ञानदेव जोर्वेकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे अधिक तपास करीत आहेत.