सांभाळाचा आला कंटाळा : मुलांनी केला वडीलांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 06:11 PM2021-05-20T18:11:11+5:302021-05-20T18:13:21+5:30
वडीलांचा कंटाळा आल्याने खून केल्याची कबुली त्यांच्या दोन्ही मुलांनी दिली.
संगमनेर : वडील नेहमीच दारू पिऊन यायचे, घरी भांडण करायचे. त्यांना दोन्ही डोळ्यांनी कमी दिसत होते, त्यामुळे त्यांच्या सांभाळ कुणी करायचा ? वडीलांचा कंटाळा आल्याने खून केल्याची कबुली त्यांच्या दोन्ही मुलांनी दिली. खून करण्यास मदत करणारी सून, मोठ्या मुलाचा मित्र या दोघांविरोधातही गुरूवारी (दि. २०) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.१९ ) दोन्ही मुलांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेत आता एकुण चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दशरथ सुखदेव माळी ( वय ६०, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांचा खून केल्याच्या संशयावरून पोलिसांनी मोठा मुलगा रामदास दशरथ माळी ( वय २५) व लहान मुलगा अमोल दशरथ माळी ( वय १८) ( दोघेही रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) या दोघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला होता. पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दशरथ माळी यांचा खून १५ मे रात्री दहा ते १६ मे सकाळी सातच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील चिखली येथे झाला होता. त्यांची दोन्ही मुले चिखली येथे वीटभट्टीवर काम करत होते. दशरथ माळी यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. माळी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकिता महाले करत होत्या. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असता त्यात दशरथ माळी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. तपासी अधिकारी महाले यांना संशय वाटल्याने त्यांनी मयत माळी यांच्या दोन्ही मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रामदास व अमोल माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही मुलांनी वडिलांचा खून केल्याची कबुली दिल्याचे तपासी अधिकारी महाले यांनी सांगितले. दशरथ माळी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी करण्यात आले, त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. मोठा मुलगा रामदास व त्याची पत्नी सविता माळी (वय २३) व त्याचा मित्र अंकुश लोखंडे (वय २३,रा. चिखली, ता. संगमनेर) या दोघांचाही या खुनाच्या घटनेत सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.