तंबाखूचे व्यसन, कोरोना प्रादुर्भावास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:54+5:302021-05-31T04:16:54+5:30

अरुण वाघमोडे अहमदनगर : तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. थुंकीमार्फत कोरोनाबाधित ...

Tobacco addiction, corona outbreak invitation | तंबाखूचे व्यसन, कोरोना प्रादुर्भावास निमंत्रण

तंबाखूचे व्यसन, कोरोना प्रादुर्भावास निमंत्रण

अरुण वाघमोडे

अहमदनगर : तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. थुंकीमार्फत कोरोनाबाधित व्यक्तीतील विषाणू हवेमध्ये पसरतात. त्यामुळे धूम्रपान करणारी व्यक्ती व त्याच्यापासून इतरांनाही धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटना व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चने स्पष्ट केले आहे. हा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात गेल्या वर्षभरात पोलीस व तंबाखू नियंत्रण समितीने कोटपा कायद्यांतर्गत ५ हजार जणांवर कारवाई करत १० लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वेळोवेळी स्वच्छ हात धुणे या नियमांसह सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे हा नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार भारतातील २८ टक्के नागरिक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. भारतात दरवर्षी ८ ते ९ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारामुळे होतो. कोरोना महामारीच्या संकटात तंबाखूचे सेवन घातक ठरत आहे.

.........

जिल्‍ह्यातील ७५ शाळा तंबाखूमुक्त

जिल्हास्तरीय तंबाखू प्रतिबंधित नियंत्रण समितीने २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ७५ शाळांमध्ये येलो लाइन उपक्रम राबवून या शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. या शाळा परिसरात दोनशे मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर शाळेचे मुख्याध्यापक अथवा स्थानिक तंबाखू नियंत्रण समितीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

...........

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात कोटपा कायद्यांतर्गत १ हजार ५१९ कारवाई करण्यात आल्या. त्यातून ३ लाख ३८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जिल्हा रुग्णालयात तंबाखू संदर्भात समुपदेशन केंद्र चालविले जाते. लोकांमध्ये तंबाखूचे व्यसन कमी व्हावे, यासाठी शाळा, महाविद्यालय व विविध ठिकाणी उपक्रम राबविले जातात.

- डॉ. हर्षल पठारे, जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

.............

तंबाखू सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या वर्षीच्या संकल्पनेनुसार ‘तंबाखू सोडण्याचे वचन द्या’ त्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालयात तंबाखू समुपदेशन केंद्र चालविले जाते. निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने अशा व्यसनापासून दूर राहावे.

- नितीन वाकळे, विभागीय व्यवस्थापक, तंबाखू नियंत्रण प्रकल्प

...........

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम

तंबाखू सेवनामुळे प्राणघातक ८ आजारांमधील ६ आजार होण्याचा धोका

तोंडामध्ये ज्या ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ ठेवले जातात त्या ठिकाणी पांढरा चट्टा, लाल चट्टा येतो

तोंड पूर्णपणे उघडत नाही, तोंडात फोड येतात.

तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, अन्ननलिका, श्वासनलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, पोट, गर्भ इत्यादी अवयवांचा कर्करोग होतो.

भूक मंदावते, पित्ताचा त्रास होतो. हृदयरोग, पक्षघात, हृदयविकाराचा झटका, क्षयरोग, मोतीबिंदू, नपुंसकता, गर्भपात आदी आजार होतात.

Web Title: Tobacco addiction, corona outbreak invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.