कोपर्डीचा आज निकाल, नराधमांना फाशी की जन्मठेप?, संजीव भोर यांच्यासह संघटनेच्या लोकांना न्यायालयात जाण्यापासून राखेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:56 AM2017-11-29T10:56:42+5:302017-11-29T10:57:06+5:30
कोपर्डी (ता़ कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील तिघा दोषी नराधमांना जन्मठेप मिळते की फाशी, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात आलेल्या शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर व कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडविले.
अहमदनगर : कोपर्डी (ता़ कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागणार असून, तिघा दोषी नराधमांना जन्मठेप मिळते की फाशी, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात आलेल्या शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर व कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडविले.
न्यायालयात जाण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला़ फिर्यादीने मला न्यायालयात सोडू नका, पण संजीव भोर यांना सोडा, अशी विनंती पोलिसांना केली़ त्यानंतर पोलिसांनी संजीव भोर यांना न्यायालयात सोडले.
दरम्यान न्यायालयाच्या मुख्य इमारतीमध्ये जाण्यासाठी दोन दरवाजापैकी एक दरवाजा बंद करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे न्यायालयात उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत.
खटल्यातील तीन्ही दोषींना न्यायालयात मोठ्या बंदोबस्तात आणण्यात आले़ कोपर्डी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला आहे. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले आहेत.
जितेंद्र शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) व नितीन भैलुमे (२६) यांच्यावर खून करणे व छेडछाड करणे तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोष सिद्ध झाला आहे. त्याअन्वये फाशी अथवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे़ बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.