आज कोव्हॅक्सिनचा, उद्या कोविशिल्डचा दुसरा डेास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:21 AM2021-05-11T04:21:12+5:302021-05-11T04:21:12+5:30
अहमदनगर : लसीअभावी नगरमधील लसीकरण मोहीम मंदावली आहे. महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांवर मंगळवारी कोव्हॅक्सिनचा, तर कोविशिल्डचा दुसरा डोस दिला ...
अहमदनगर : लसीअभावी नगरमधील लसीकरण मोहीम मंदावली आहे. महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांवर मंगळवारी कोव्हॅक्सिनचा, तर कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठीची लसीकरण मोहीम सध्या बंद ठेवण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून कोव्हॅक्सिनचे ३५०, तर कोविशिल्डचे १०० डोस महापालिकेला प्राप्त झाले आहेत. पहिला डोस घेतलेल्यांना सहा आठवड्यांनी दुसरा डोस देणे गरजेचे आहे. त्यामुळे ही लस दुसरा डोस घेणाऱ्यांना दिली जाणार आहे. तसे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनच्या सात आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० डोस वितरित केले जाणार असून, कोविशिल्डचे दुप्पट म्हणजे प्रत्येकी १०० डोस आरोग्य केंद्रांना दिले जाणार आहेत. मंगळवार व बुधवारी हे दोन्ही दिवस दुसरा डोस दिला जाणार असल्याने, पहिला डोस घेणाऱ्यांनी केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १० हजार डोस प्राप्त झाले होते. हे डोस शुक्रवारी संपले. त्यानंतर नव्याने डोस लस उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण शनिवारपासून बंद आहे. अनेक नागरिकांनी ॲपवर नोंदणी केली. परंतु, लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर या वयोगटातील नागरिकांनाही लस दिली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्राकडून सांगण्यात आले.
.....
नगर शहरातील एकूण लसीकरण
१८ ते ४४ - १०,६१२
४५ ते ६० - १६,७८०
६० वर्षांपुढील - २०,०२०