जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत आज तोडगा

By Admin | Published: September 10, 2014 11:32 PM2014-09-10T23:32:42+5:302023-10-27T16:19:38+5:30

अहमदनगर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेतला होता.

Today, the Zilla Parishad rule will be resolved | जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत आज तोडगा

जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत आज तोडगा

अहमदनगर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेतला होता. त्यानुसार गुरूवारी (दि.११) काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तिन्ही मंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी १४ तारखेला होणाऱ्या पंचायत समिती पदाधिकारी आणि २१ तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीबाबात चर्चा होऊन निर्णय होणार आहे.
जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवित, ऐनवेळी सेना-भाजपासोबत घरोबा करत काँग्रेसला सत्तेपासून लांब ठेवले होते. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्याबळ असतांनाही जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत अडचण होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे.
गुरूवारी मुंबईत सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीला पालकमंत्री मधुकर पिचड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे, पांडुरंग अभंग, सरचिटणीस सोमनाथ धूत उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जिल्ह्यात अधिकाधिक पंचायत समिती सत्ता आणि जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीबाबत चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने निवड होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे अद्याप अंतिम केलेली नाहीत. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेला सदस्य अथवा ओबीसी दाखला असणाऱ्या महिला सदस्याची या ठिकाणी निवड करता येणार आहे. यासह राष्ट्रवादीच्या वाट्याला अर्थ आणि बांधकाम ही महत्वाची समिती असून पहिले अडीच वर्ष उत्तरेकडे हे पद होते. यंदा दक्षिणेला संधी मिळावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Today, the Zilla Parishad rule will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.