टोमॅटोने ३० दिवसात शेतकरी झाला मालामाल; ३५ गुंठ्यात पाच लाखांचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 03:36 PM2020-07-12T15:36:49+5:302020-07-12T15:38:49+5:30
लॉकडाऊनच्या काळात ३० दिवसांत ३५ गुंठ्यात पावणे पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील वैभव शिवाजी भोर यांनी मिळविले. लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करत त्यांनी हे उत्पन्न मिळविले आहे.
रामप्रसाद चांदघोडे ।
घारगाव : शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाचा वापर करत बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पन्न घेतल्यास शेतक-याला नफा झाल्याशिवाय राहत नाही. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेत लॉकडाऊनच्या काळात ३० दिवसांत ३५ गुंठ्यात पावणे पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील वैभव शिवाजी भोर यांनी मिळविले. लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करत त्यांनी हे उत्पन्न मिळविले आहे.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील युवा शेतकरी वैभव भोर यांनी यावर्षी ३५ गुंठ्यात टोमॅटोची लागवड केली. साधारणत: एप्रिल महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करून शेतात मल्चिंग टाकून लागवड केली. ४ बाय २ बेड अशा पद्धतीने सव्वा फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे आणि खताचे नियोजन केले. हवेतील आर्द्रता कमी करण्यासाठी स्प्रिंकलरचा उपयोग केला आहे. ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. त्यामुळे टोमॅटोचे पीक जोमात आले. वेळेच्या वेळेला खते आणि पाणी त्यांनी दिले.
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे खते, औषधे मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. अशा कठीण परिस्थितीत भोर यांनी टोमॅटोचे भरघोस उत्पन्न घेतले. ३५ गुंठ्यात भोर यांना आजपर्यंत बाराशे कॅरेट टोमॅटोचे उत्पादन मिळाले. आणखी पाचशे ते सहाशे कॅरेट अधिक उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे. पुुणे जिल्ह्यातील नारायणगाव या बाजारपेठेमध्ये या टोमॅटो विक्रीसाठी नेतात. ३५० ते ६५० रुपये एका कॅरेटला भाव मिळत आहे.
बियाणे, मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोचे झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. खर्च वजा करून जवळपास पाच लाखांचे उत्पन्न टोमॅटोतून मिळणार आहे.
लॉकडाऊनच्या काळातच टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी बियाण्यापासून खतासाठी कसरत करावी लागली. आधुनिक पध्दतीने टोमॅटोचे उत्पन्न घेतल्यामुळे चांगले उत्पादन मिळत आहे. रासायनिक आणि सेंद्रिय शेतीचा योग्य पध्दतीने जोड दिल्यास भरघोस उत्पादन मिळते. बाजारभावाची साथ मिळाल्यास अडचण येत नाही.
- वैभव भोर, शेतकरी.