पहिल्या कोरोना रुग्णापासून पहिल्या लसीकरणापर्यंतचा कणखर लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:11+5:302021-04-06T04:19:11+5:30
महापालिकेचे माळीवाडा येथे महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती ढापसे यांच्यासह १० कर्मचाऱ्यांवर या आरोग्य ...
महापालिकेचे माळीवाडा येथे महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती ढापसे यांच्यासह १० कर्मचाऱ्यांवर या आरोग्य केंद्राची मदार. येथील ८ कर्मचारी महिला आहेत. घरातील सर्व कर्तव्ये पार पाडून हे कर्मचारी कोरोना विरोधात लढत आहेत. याच आरोग्य केंद्राच्या हद्दीत पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. कोरोनाच्या पहिल्या रुग्णापासून हे केंद्र कोरोनाविरोधात लढत आहे. कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांचे व संपर्कातील व्यक्तिंना शोधून त्यांची कोरोना चाचणी करणे आणि जर ते पॉझिटिव्ह असतील तर त्यांना ॲडमिट करण्यापर्यंत या केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली. आता तर लसीकरणाचीही जबाबदारी ते पेलत आहेत. लसीकरण करतानाही अरेरावी, दमदाटीचे प्रकार घडले. पण या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सेवेचे व्रत सोडले नाही.
......................
लोकांनी सहकार्य करावे
महात्मा फुले आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांचे स्वॅब घेण्यापासून ते लसीकरण करण्यापर्यंत काम केले जाते. मात्र, काहीजण येथील आरोग्य कर्मचाऱ्यांवर वेगवेगळे आरोप करतात. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नाहीत. अनेकदा नागरिक आमचे ऐकत नाहीत, म्हणून आम्हाला पोलिसांनादेखील बोलवावे लागते. आमचा जीव धोक्यात घालून आम्ही लोकांसाठी येथे राबत आहोत. त्यामुळे लोकांनी आम्हाला सहकार्य करावे. दिलेल्या सूचना पाळाव्यात एवढीच आमची कळकळीची विनंती आहे.
- राजश्री ढोमणे, आरोग्यसेविका
....................
दिवसभर कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहिल्यानंतर घरी कुटुंबात मिसळताना मोठी काळजी घ्यावी लागते. कोरोना काळात सर्व कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांच्या कोरोनामुक्तीसाठी अविरत लढा दिला. आजही आमचे काम सुरुच आहे. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार रोज कोरोनाचे लसीकरण करीत आहोत. लसीकरण सुरु असताना कोरोना रुग्णांचे स्वॅबही घेत आहोत. कोरोनाची आरटीपीसीर टेस्ट करीत आहोत.
- आरती ढापसे, वैद्यकीय अधिकारी, महात्मा फुले आरोग्य केंद्र