भंडारद-यात पर्यटकांचा ‘विकेंड’ : फेसाळते धबधबे, फॉलचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:28 AM2019-08-12T11:28:07+5:302019-08-12T12:55:12+5:30
सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी भंडारदरा परिसरात रविवारी दिवसभर येथील निसर्गाचा मनोहारी आविष्काराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली होती.
प्रकाश महाले
राजूर/भंडारदरा : सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी भंडारदरा परिसरात रविवारी दिवसभर येथील निसर्गाचा मनोहारी आविष्काराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली होती.
गेल्या पंधरा दिवसांहून अधिक दिवस भंडारदरा पाणलोटात धो-धो पाऊस कोसळत होता. त्यामुळे येथील निसर्गाला नवलाई चढली आहे. भंडारदरा धरणाच्या रिंग रोडवरील सह्याद्रीच्या गिरीशिखरांहून कोसळणाऱ्या धबधब्यांची श्रृंखलाच नजरेत भरत आहे. सर्वच धबधब्यांची फेसाळत कोसळण्याची जणू काही स्पर्धाच येथे सुरू झालेली आहे.
तुडुंब भरलेली भात खाचरे, त्यातून ओसंडून वाहणारे पाणी, वेगाने वाहणारे ओढे, नाले यामुळे जलमय झालेला सर्वदूर परिसर, निसर्गाला आलेला तजेला आणि ओतप्रोत भरलेला भंडारदरा धरणाचा जलाशय डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आता या परिसरात जिल्ह्याबरोबरच नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे,औरंगाबाद आदी जिल्ह्यांतील पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.
रविवारी दिवसभर येथे पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे पर्यटकांना रविवारी मनमुरादपणे आनंद लुटता आला. घाटघर परिसरात येणाºया धुक्यामुळे काही काळ या धुक्यात गडप होणारा निसर्ग, त्यामागोमाग येणाºया वाºयाची झुळूक आणि त्यापाठोपाठ टपोºया थेंबांनी येणाºया पावसाची मोठी सर,या सरीमध्ये आणि जागोजागी पडणाºया धबधब्यांच्या खाली ओलेचिंब होण्याचा मोह पर्यटकांना आवरत नसल्याचे दिसून येत होते. रतनवाडी जवळील फेसाळत कोसळणारा न्हाणी फॉलचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तासन् तास रेंगाळलेले दिसत होते. त्यावरील बाजूला वन्यजीव विभागाने तयार केलेल्या लोखंडी पुलावर जाऊन आपल्या आठवणी मोबाईल कॅमेºयात बंद करण्यासाठी चढाओढ करीत होते. तेथून जवळच असणारा नेकलेस फॉल, पांजरे फॉल व इतर धबधब्यांंच्या ठिकाणीही रविवारी पर्यटकांची गर्दी दिसत होती. एकूण या आठवड्यात पुन्हा पंधरा आॅगस्ट आणि त्यालाही जोडून येणाºया सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.
रविवारी दिवसभर पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे धरणांमध्ये येणा-या नवीन पाण्याची आवकही मंदावली होती. यामुळे धरणांमधून सोडण्यात येणा-या पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला.
भंडारदरा धरणातून दिवसभर ५ हजार ७४८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तो सायंकाळी सहा वाजता कमी करत ४ हजार ६०० क्युसेक करण्यात आला. निळवंडे धरणातून १० हजार १२७ क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात सोडण्यात येत होते.