पर्यटकांच्या गर्दीने भंडारदरा परिसर ओव्हर-फ्लो! नाताळनिमित्त सुट्यांची पर्वणी; दोन हजार कापडी तंबू सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 08:19 PM2017-12-25T20:19:49+5:302017-12-25T20:23:11+5:30
नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमधे जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास दोन हजार कापडी ‘तंबू’सज्ज झाले असून, नाताळनिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसरात पर्यटकांचा फुलोरा फुलला आहे.
हेमंत आवारी
अकोले : नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमधे जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास दोन हजार कापडी ‘तंबू’सज्ज झाले असून, नाताळनिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसरात पर्यटकांचा फुलोरा फुलला आहे.
‘तंबू’ हे यावर्षीचे खास नवे आकर्षण आहे. भंडारदरा जलाशयाभोवती ४५ किलोमीटरचा रिंगरोड असून, या परिसरात धरणाच्या काठावर आदिवासी युवकांनी पर्यटकांच्या निवासासाठी कापडी तंबू उभारले आहेत. भंडारदार शेंडी येथील पर्यटन विकास महामंडळाचे लेक व्ह्यू, आनंदवन, यश, अमीत, अमृत व्हिला आदींसह सर्व रिसोर्ट, हॉटेल व शासकीय विश्रामगृहे गर्दीने ओसंडल्याने पर्यटकांसाठी स्थानिक युवकांनी वन्यजीव व आदिवासी विभागाच्या मदतीने मिळालेल्या कापडी तंबंूच्या साहाय्याने तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे.
मुरशेत, पांजरे-उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल या भागांतील शेकडो आदिवासी तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे येथील शेकडो तरुणाईला रोजगार उपलब्ध झाला आहे. साधारणपणे प्रतिव्यक्ती ४५० ते १२०० रुपयांपर्यंत एक दिवसाचा खर्च पर्यटकांकडून घेतला जातो. चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण, शेकोटी, बोटफेरी अशा सुविधा दिल्या जातात. जलाशयानजीक हे तंबू लावलेले असून, पाण्याच्या निळाईत शेकोटीची धग निवळताना दिसते. परिसरात आशिया खंडातील दोन नंबरची गूढरम्य सांधन दरी, शिखर स्वामिनी कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, आज्या पर्वत, आलंग-मलंग-कुलंग गड, घनचक्कर, करंडा, खुंटा, कात्राईची खिंड आदी गड, डोंगर असून, येथे सलग सुट्यांमुळे पर्यटक व गिर्यारोहकांची मांदियाळी आहे. मुंबई-नाशिक भागातील पर्यटक तुलनेने जास्त आहे. एक दिवसाच्या कौटुंबिक सहलीपण मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावताना दिसत असून, नौकाविहराचा आनंद घेतात.
भंडारदरा धरणाच्या ‘स्पिल वे’सांडवा गेट जवळ पाण्याच्या कडेला पर्यटकांना कॅम्पिंगचा आनंद मिळावा म्हणून जवळपास २५० तंबू लावण्यात आले आहेत. येथे सतत वाहतुकीची कोंडी अनुभवास येत असून, पर्यटक व वाहनांच्या गर्दीने हा परिसर फुलला आहे.
कळसूबाईगडावर अस्वच्छता आहे. येथील छोटे व्यावसायिकच सिगारेट, दारू पाहिजे का? असे विचारतात, मग स्वच्छाता कशी राहणार? गडाच्या पायथ्याला गाडी पार्क करतो. तेथेही गडावर यांना भेटा ते तुमची सर्व सोय करतील? असे सांगितले जाते. पोलिसांनी व वन विभागाने याची दखल घ्यावी.
-सुहास कदम, चेंबूर, गिर्यारोहक.