नगरला श्वानांची दहशत : पालिका सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 03:11 PM2019-02-23T15:11:32+5:302019-02-23T15:11:49+5:30
ग्रामीण भागात बिबट्यांची जेवढी दहशत आहे, तेवढीच दहशत नगरमध्ये श्वानांची आहे. नगर शहर भयमुक्त झाले पाहिजे, असे खरेच कोणाला वाटत असेल तर आधी या श्वानांपासून भयमुक्ती द्या, अशीच नागरिकांची भावना असेल.
सुदाम देशमुख
अहमदनगर : ग्रामीण भागात बिबट्यांची जेवढी दहशत आहे, तेवढीच दहशत नगरमध्ये श्वानांची आहे. नगर शहर भयमुक्त झाले पाहिजे, असे खरेच कोणाला वाटत असेल तर आधी या श्वानांपासून भयमुक्ती द्या, अशीच नागरिकांची भावना असेल. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच गल्लोगल्ली असलेल्या या श्वान आणि त्यांच्या टोळक्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. महापालिकेतील सत्ताधारी असोत की प्रशासन दोघांनाही श्वानांपासूनचे भय कमी करण्यात अपयश आले आहे. रात्री अपरात्री एकटे रस्त्यावरून जाणे, सकाळी लवकर फिरायला जाणे, लहान मुलांना एकटे सोडणे म्हणजे नगरमध्ये धोक्याचेच आहे. कधी कोणता श्वान चावा घेईल, हे सांगताच येत नाही. लहान मुलांना सायकलवर फिरणे तर धोक्याचेच झाले आहे.
महापालिकेने मोठे-मोठे कंटेनर, कुंड्या खरेदी केल्या. मात्र तेथून कचरा संकलन करण्याची सोय महापालिकेकडून होत नाही. त्यामुळे कचरा कुंड्या ओव्हर फ्लो दिसतात. अनेक मोकळ््या जागेत, रस्त्याच्या कडेला, चौकात सगळीकडे कचराच कचरा पसरलेला असतो. याच कचऱ्यावर मोकाट श्वानांची जत्रा भरते. महापालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार आणि त्यांचे मजूर यांना आतापर्यंत श्वान पकडणे शक्य झाले नाही. श्वान पकडण्याची, त्यांची नसबंदी केल्याची आकडेवारी कागदावर दिसते, मात्र प्रत्यक्षात रस्तोरस्ती श्वानांचे टोळके बघून लहान मुलेच काय मोठेही घाबरतात. रस्त्याने जाणे कठीण होते. सकाळी फिरायला जाणारे आणि रात्री कामावरून उशिरा येणाºयांना या श्वानांचा मोठा उपद्रव पहायला मिळतो. वाहनांच्या मागे अर्धा कि.मी. पर्यंत पाठलाग करणाºया श्वानांमुळे दुचाकीचालकांना त्यांचा जीव मुठीत धरून जावे लागते. अनेक हॉटेलच्या बाहेर खरकटे पडलेले असते. त्याभोवती श्वानांचा पिंगा असतो. हेच श्वान नंतर उपद्रवी बनतात. आपल्याच भागात या श्वानांची दादागिरी आपणाला खपवून घ्यावी लागते.
मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात महापालिका पूर्णपणे अशस्वी ठरली आहे. ठेकेदार काय करतो, किती श्वान पकडतो, याची फक्त कागदोपत्री आकडे ठेवले जातात. बिले काढण्यापुरताच हा ठेका आहे. सत्ताधारी पक्षांनाही त्याचे काही देणे घेणे नसते. एखाद्या मुलाचा बळी गेल्यानंतर सगळेच आरडाओरडा करतात. मात्र दैनंदिन स्वच्छतेकडे, श्वानांच्या उपद्रवाकडे कोणाचेही लक्ष नसते. महापालिका प्रशासन जेवढे जबाबदार आहे, तेवढेच निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही याला जबाबदार आहेत.
शहरातील कच-याची विल्हेवाट लावली जात नाही. जागोजागी कच-याचे ढीग साचलेले आहेत. जुन्या शहरात ब-यापैकी स्वच्छता होते. कच-याचे ढीग क्वचित ठिकाणी दिसतात. मध्य शहराचा भाग सोडला तर संपूर्ण शहरात जिकडे तिकडे कचरा पसरलेला दिसतो. काही मोजक्या वसाहतींमध्येच घंटागाड्या येतात. अन्य भागात घंटागाडी येत नसल्याने नागरिक कुठेही कचरा फेकून देतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील स्वच्छतेचा विषय कधीच गंभीरपणे हाताळला नाही. घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्वच्छता निरीक्षक आणि तीन हजार सफाई कामगार असूनही शहर गलिच्छ दिसते. वाढत्या वसाहती आणि लोकसंख्येप्रमाणे कचरा संकलन करणा-या वाहनांची संख्याही वाढणे गरजेचे आहे. १४ व्या वित्त आयोगाचा कोट्यवधी रुपयांचा निधी धूळखात पडलेला असताना तो खर्च करण्याची बुद्धी अधिका-यांना कधी येणार?
कचरा नव्हे खतरा
कचरा म्हणजे कचरा नव्हे तर खतरा ठरलेला आहे. या कचºयामुळे एका चिमुकल्याचा बळी गेला. त्याला महापौरांनी एक लाख रुपयाची मदतीची घोषणा केली. हा दिलासा असला तरी त्या मातेचे मूल परत मिळणार का? ज्यांच्यावर शहराच्या आरोग्याची जबाबदारी आहे. त्यातील एकाही अधिका-याची चौकशी झाली नाही की त्यांच्यावर कारवाईही झाली नाही. त्यामुळेच अधिकारी निर्ढावलेले आहेत. आयुक्त असलेल्या जिल्हाधिकारी यांनीही शहराच्या स्वच्छतेकडी बारकाईने लक्ष दिले नाही. उलट अधिकाºयांच्या अंतर्गत राजकारणावर अंकुश ठेवण्यातच त्यांची शक्ती खर्च झाली. श्वान पकडणाºया ठेकेदाराने कुत्रे कशी पकडतात, त्याची प्रात्यक्षिके पदाधिकारी, अधिका-यांसमोर झाली की त्यांचा ठेका फायनल होतो.
श्वान पकडण्याचा किस्सा
सहा महिन्यांपूर्वी बोरुडे मळ््यात एक उपद्रवी श्वान पकडण्यासाठी श्वान पथकाला फोन केला. त्यांची टीम आली. गाडी आली, मात्र त्यांना एक श्वान पकडणे शक्य झाले नाही. त्या श्वानाने पथकाच्या जवानांना घामाघूम केले. पथकाने जाळ््या टाकून श्वान पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना श्वान हाती लागला नाही. त्याच श्वानाची बोरुडे मळ््यावर अजून दहशत आहे. याशिवाय त्याच्या सोबतीला अनेक श्वान गोळा झाले असल्याने नागरिक जीव मुठीत धरून चालतात. एकदा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा येतो म्हणून गेलेले पथक पुन्हा त्या भागात फिरकलेच नाही. मात्र कागदावर मात्र दहा श्वान पकडल्याची नोंद नक्कीच झाली असणार? यात शंकाच नाही.