पेरणी करताना ट्रॅक्टर उलटला; आजोबा-नातवाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:38+5:302021-09-26T04:23:38+5:30
पळवे/सुपा : पेरणी सुरू असताना ट्रॅक्टर उलटून आजोबा-नातवाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२४) दुपारी साडेचारच्या सुमारास पारनेर तालुक्यातील ...
पळवे/सुपा : पेरणी सुरू असताना ट्रॅक्टर उलटून आजोबा-नातवाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२४) दुपारी साडेचारच्या सुमारास पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील अलभरवाडी शिवारात घडली.
याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब शेळके (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक जालिंदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८, रा. यादववाडी, तरडे मळा, ता. पारनेर) याच्या विरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
तुकाराम भिमाजी तरडे (वय ४५) व शुभम दत्तात्रय तरडे (वय १३, दोघे रा. अलभरवाडी, वाडेगव्हाण, ता. पारनेर) अशी मृत्यू झालेल्या आजोबा-नातवाचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारी जालिंदर गुलदगड हा वाडेगव्हाणच्या अलभरवाडी शिवारात शेतामध्ये छोट्या ट्रॅक्टरच्या सहायाने पेरणी करीत होता. तुकाराम तरडे व शुभम दत्तात्रय तरडे हे पेरणी यंत्रावर बसून पेरणी करत होते. पेरणी सुरू असताना दुपारी साडेचारच्या सुमारास चालकाने ट्रॅक्टर बांधावर घातला. बांधावर गेलेला ट्रॅक्टर पलटला. त्यावेळी तुकाराम तरडे व शुभम तरडे हे दोघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले. दोघांच्याही डोक्यात, पोटात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दुर्घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास सहायक फौजदार ए. एस. पठाण करीत आहेत.