शेतकऱ्यांची फसवणूक करणारा व्यापारी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:18 AM2021-04-05T04:18:30+5:302021-04-05T04:18:30+5:30
श्रीरामपूर तालुका : दहा दिवसांची पोलीस कोठडी श्रीरामपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून दोन कोटी ८० लाख रुपयांची ...
श्रीरामपूर तालुका : दहा दिवसांची पोलीस कोठडी
श्रीरामपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून दोन कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींमध्ये गणेश मुथ्था व आशा मुथ्था यांचा समावेश आहे. त्यांना चोपडा (जि.जळगाव) येथून पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात अद्यापही रमेश मुथ्था व चंदन मुथ्था हे पितापुत्र व्यापारी फरार आहेत. ९ फेब्रुवारी रोजी या आरोपींवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी व्यापारी हे माळवाडगाव (ता.श्रीरामपूर) येथील आहेत. त्यांचे येथे भुसार खरेदीचे मोठे गुदाम असून, कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. त्यांनी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केली होती. त्यासाठी अनेकांना धनादेश दिले होते. मात्र त्यांनी घर व गुदामाला कुलूप लावून अचानक पलायन केल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आले.
व्यापारी मुथ्था यांच्याकडे बँक व पतसंस्थेचे कर्ज आहे. त्याबदल्यात सोयाबीनची पोती त्यांनी तारण ठेवली आहेत. आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्यामुळे या बाबींची माहिती आता उजेडात येणार आहे. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, हवालदार नवनाथ बर्डे, काकासाहेब मोरे, दादासाहेब लोढे यांनी आरोपींना अटक केली. लवकरच दोन्ही फरार आरोपींना ताब्यात घेऊ, असा विश्वास निरीक्षक साळवे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अशाच एका प्रकरणातील आरोपी नवल बोरा मात्र दोन महिन्यांपासून पोलिसांना मिळून आलेला नाही. त्यानेही सोयाबीन खरोदीत शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केलेली आहे.